अकलूज मधील सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये फिरत्या पाळण्यामध्ये भीषण अपघात,एकाचा मृत्यू

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या असून शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, अद्यापही पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटक दिसून येत आहेत. निसर्गरम्य ठिकाणी किंवा पार्कमध्ये साहसी खेळाचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमधील (Water park) फिरत्या पाळण्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली. येथील पार्कमध्ये वेगात पाळणा फिरत असताना एक पाळणा निसटून पडल्याने पाळण्यातील तिघेजण जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत भिगवण येथील तुषार धुमाळ नावाचे व्यावसायिक अत्यंत गंभीर जखमी झाले होते. धुमाळ यांना तात्काळ अकलूज येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे. धुमाळ हे भिगवण येथील नावाजलेले एलआयसी उद्योजक आहेत. दरम्यान, अपघातातील इतर दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्क हे सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आणि वॉटर पार्क आहे. जिल्ह्यासह जवळील जिल्ह्यातून याठिकाणी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पर्यटक येतात. जयसिंह मोहिते पाटील यांच्या मालकीचे हे वॉटर पार्क असून दुर्दैवाने आज येथील पाळण्याच्या झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघा जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी, एकाच्या मानेला फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे. तर, पाळण्यातील तिसरा व्यक्ती घाबरला असून तो किरकोळ जखमी आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *