भाजप नेते देवेंद्र फडणवीस आज (गुरुवार) तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक ज्येष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मात्र या कार्यक्रमापूर्वी शिवसेनेचे (यूबीटी) राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले असून, त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे.
शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना भाजपला आता एकनाथ शिंदे यांची गरज नसल्याचे म्हटले आहे. भाजप त्यांचा पक्षही फोडू शकतो. संजय राऊत म्हणाले, “आता एकनाथ शिंदे यांची वेळ संपली आहे, त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या आहेत. आता शिंदे कधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. शिंदे यांचा पक्षही भाजप फोडू शकतो. आजपासून देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होतील.
ते पुढे म्हणतात, “बहुमत असूनही ते 15 दिवस सरकार बनवू शकले नाहीत. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की पक्षात काहीतरी गडबड सुरू आहे. उद्यापासून हा गोंधळ तुम्हाला दिसेल. ते देशहितासाठी काम करत नाहीत, स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. पण तरीही आम्ही मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो आणि आगामी काळात तुम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी काम करा.