मुंबई, ठाणे, .. या शहरांना उन्हाचा फटका,तर ‘या’ जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यानंतर आता महाराष्ट्रात पुन्हा वातावरणात बदल होणार आहे. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. येत्या ५ ते ८ एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात सर्वत्रच उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक उष्णतेचा सामना करावा लागू शकतो, असे आयएमडीने म्हटले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि लातूर या जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. फक्त महाराष्ट्र नव्हे तर उत्तर पश्चिम भारतातही पुढील सहा दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे दिल्लीमध्ये तापमान ४२ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याव्यतिरिक्त, दक्षिण हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, गुजरात, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश या राज्यांमध्येही उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे.

सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मध्य आणि उत्तर-पश्चिम भारतातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानात २ ते ४ अंश सेल्सियसची वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये ६ किंवा ७ एप्रिलपर्यंत काही ठिकाणी दिवसाचे तापमान ४२ अंश सेल्सियसपर्यंत असेल, असे म्हटलं जात आहे. यावर्षी एप्रिल ते जून या काळात भारतात सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तवला होता.

उत्तर-पश्चिमी मैदानी भागांमध्ये अधिक उष्णता
त्यानुसार मध्य आणि पूर्व भारतासह उत्तर-पश्चिमी मैदानी भागांमध्ये अधिक उष्णता पाहायला मिळत आहे. राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या उत्तर भागांमध्ये उष्ण वारे वाहण्याची शक्यता आहे. विशेषत: उत्तर प्रदेशाचा पूर्वेकडील भाग, झारखंड, छत्तीसगड आणि ओडिशा या राज्यांमध्ये १० ते ११ दिवस उष्ण वारे वाहू शकतात.

मुंबईमध्ये तापमानात वाढ
गेल्यावर्षी भारतात अशाचप्रकारे उष्णतेची लाट पसरली होती. हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा वारंवार आणि अधिक तीव्र होत असल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे. २०२२ च्या एका अभ्यासानुसार, २१ व्या शतकात उष्णतेच्या लाटेचा धोका १० पटीने वाढू शकतो. तसेच भारताच्या ७० टक्क्यांहून अधिक ठिकाणी याचा फटका बसू शकतो. सध्या मुंबईमध्ये तापमानात वाढ झाली आहे. शुक्रवारी कुलाबा आणि सांताक्रूझ या ठिकाणी ३३.७ अंश सेल्सियस कमाल तापमान नोंदवण्यात आले आहे. ढगाळ वातावरणामुळे मुंबईकरांना सकाळपासूनच उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. गेले दोन ते तीन दिवस मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये उष्ण हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *