मकर संक्रात (Makar Sankranti 2025) सणाचा आनंद घेताना पतंग उडवण्याच्या नादात वापरलेला नायलॉन मांजा (Nylon Manjha) अनेकांचे प्राण घेतो आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी मकर संक्रांती 2025 पूर्वीच बंदी घातलेला मांजा (Chinese Manjha Ban) वापरणाऱ्यांविरोधात कारवाई तीव्र केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 35,350 रुपये किमतीचा मांजा जप्त (Nylon String Seizure) केला असून, त्याचा वापर आणि विक्री करणाऱ्या 19 जणांवर भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी काहींना अटकही करण्यात आल्याची माहिती आहे.
मांजाचा वापर, गुन्हे आणि अटक
पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनूसार, नायलॉन मांजा वापरण्याविरोधात प्रामुख्याने 10 ते 13 जानेवारी दरम्यान तीव्र कारवाई करण्यात आली. या कारवाईत कायद्याने अवैध ठरवण्यात आलेली पतंगाची दोरी (धागा) वापरणाऱ्या अनेकांवर गुन्हा दाखल करुन त्यातील काहींना अटक करण्यात आली. त्यांच्यावर अनेकांच्या जीवितास धोका निर्माण करणे, गंभीर दुखापत घडवून आणने आणि मृत्यूस कारण ठरणे यांसारखे विविध आरोप ठेवण्यात आले आहेत. या कारवाईचा उद्देश धोकादायक नायलॉन धाग्यावरील बंदी लागू करणे आहे, जी सामान्यतः पतंग उडवण्यासाठी वापरली जाते. ज्यामुळे अनेकांना दुखापत होते तर काहींचा मृत्यूही झाला आहे.
मांजावर बंदी का?
नायलॉन धागा किंवा चिनी मांझा, त्याच्या तीक्ष्ण धारधारपणा आणि टिकाऊपणामुळे प्रतिबंधित आहे. ज्यामुळे मानव आणि प्राण्यांना गंभीर धोका निर्माण होतो. धाग्याच्या रेझरसारख्या गुणधर्मांमुळे व्यक्तींना जीवघेण्या दुखापती किंवा मृत्यू झाल्याच्या असंख्य घटना नोंदवल्या गेल्या आहेत. धागा तुटत नसल्याने आणि घर्षणामुळे कोणत्याही जीवास तो थेट चिरत नेतो. जसे की, अनेक दुचाकीस्वारांचे गळे चिरले गेले आहेत. प्राण, पक्षी यांचे पंख आणि इतर अवयव कापले गेले आहेत. त्यामुळे क्षणभराच्या आनंदासाठी या मांजावर बंदी घालण्यात आली आहे.
मांजा कापल्याने वसई येथे दुचाकीस्वार जखमी
दुचाकीवरुन प्रवास करताना रस्त्यामध्ये अडकलेला मांजा कापून वसई येथील दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. वसई येथे मकर संक्रांती सणानिमित्त पंतग उडविण्याचा आनंद अनेकांकडून घेण्यात आला. दरम्यान, तुटलेल्या पतंगाचा मांजा रस्त्यावर अडकून राहिला होता. याच दरम्यान, पीडित विक्रम डांगे हा आपली पत्नी आणि मुलासह मधुबनी परिसरातून निघाला असता ही घटना घडली. दरम्यान, पतीच्या गळ्याला झालेली खोलवर जखम आणि होणारा रस्तस्राव पाहून डांगे यांच्या पत्नीने तातडीने आपली ओढणी पतीच्या गळ्याला बांधली आणि जवळच्या लोकांकडे मदत मागितली. पत्नीने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे डांगे यांच्या शरीरातून होणारा अतिरक्तस्त्राव थांबला आणि त्यांचे प्राण वाचले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, वैद्यकीय उपचारानंतर दुसऱ्याच दिवशी डिस्चार्ज देण्यात आला.
दरम्यान, वसई येथील घटनेनंतर पतंग उडवण्याचा कार्यक्रम आयोजित केलेबद्दल पोलिसांनी बीएनएसच्या विविध कलमांखाली आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विभागीय उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रृंगी यांनी कारवाईची पुष्टी केली आणि सांगितले की, ‘आम्ही चिनी मांजाची विक्री आणि वापर रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करत आहोत. सार्वजनिक सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.’ पतंगाच्या दोऱ्या विकण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बाजारपेठांमध्ये अचानक तपासणी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी अनेक पथके तैनात केली आहेत. अधिकाऱ्यांनी उल्लंघनांसाठी शून्य-सहिष्णुता धोरणावर भर दिला आहे, नागरिकांना बंदी घातलेल्या उत्पादनाचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे.