मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा कोलमडली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय लोकल सेवेतील हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाशी रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे हार्बर रेल्वे वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहे. यामुळे चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हार्बर रेल्वे मार्गावरील वाशी स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. सकाळी साधारण 8 च्या दरम्यान ही ओव्हरहेड वायर तुटल्याने मोठा तांत्रिक बिघाड झाला. यामुळे पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सकडे येणारी वाहतूक उशिराने सुरु आहे. गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून हार्बर मार्गावरील अनेक लोकल या विविध स्थानकात थांबल्या आहेत. तर काही लोकल या ट्रॅकवरही थांबल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे हार्बर रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.
प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरुन चालत प्रवास
मुंबईच्या हार्बर मार्गावरील वाशी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. यामुळे वाशी, कुर्ला या रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यामुळे वाशी ते पनवेल आणि कुर्ला ते सीएसएमटी रेल्वे सेवा उशिराने सुरु आहे. अनेक प्रवाशी हे जीव मुठीत घेऊन रेल्वे ट्रॅकवरुन चालत प्रवास करत आहेत.
मध्य रेल्वेने दिली माहिती
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हार्बर मार्गावरील मानखुर्द आणि वाशी स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. सध्या ही ओव्हरहेड वायर दुरुस्त करुन वाहतूक पूर्ववत करण्याचे काम वेगाने सुरु आहे.
तरी या कालावधीत प्रवाशांना काढलेल्या त्याच तिकीट आणि पासचा वापर करत ट्रान्सहार्बर मार्गे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ओव्हरहेड वायर दुरुस्त होईपर्यंत प्रवाशांना ट्रान्सहार्बरद्वारे प्रवास करता येईल. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
प्रवाशांचा मोठा खोळंबा
मुंबईतील लाखो नागरिक हे सकाळी मुंबई लोकलने प्रवास करत असतात. सकाळी लाखो चाकरमानी हे मुंबई लोकलने प्रवास करत ऑफिस गाठतात. तर काही विद्यार्थी आपपल्या शाळा-कॉलेजला जाण्यासाठी लोकलने प्रवास करतात. मात्र अचानक हा बिघाड झाल्याने या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांना ऑफिसला पोहोचायला, तसेच विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाण्यास उशीर होणार असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे कर्मचारी संतप्त झाले आहेत. तसेच रेल्वे उशिराने धावत असल्याने स्टेशनवरही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.