शिक्षण विभागात एक महापॉवरफुल अधिकारी मागील तारखा टाकून लाखो रुपये उचलत असल्याचा आरोप भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी केला. संजय उपाध्याय यांनी मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आणि त्यांच्या विरोधात लक्षवेधी उपस्थित केली. त्यानंतर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी संदीप सांगवे यांना निलंबित केल्याची घोषणा केली.
संजय उपाध्यय यांचे गंभीर आरोप
भाजपचे आमदार संजय उपाध्याय यांनी मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, महापॉवरफुल अधिकारी माझ कोणी काही करू शकत नाही असं वारंवार बोलून दाखवतो. मागील तारखा टाकून लाखो रूपये उचलत शेकडो फाईल मंजूर केल्या आहेत. या अधिकाऱ्याने शासनाच्या तिजोरीचं कोट्यवधी रूपयांचं नुकसान केलं आहे.
संदीप सांगवे यांची लक्षवेधी लागली तर याचे अनेक दलाल माझ्याकडे आले. ही लक्षवेधी सभागृहात मांडूच शकणार नाही असं खुलं आव्हान मला या अधिकाऱ्यानं दिलं होतं असं संजय उपाध्यय म्हणाले. ते म्हणाले की, “महापालिकेतील अधिकारी माझ्यावर रेकी करत होते. एकही आमदार माझ्या विरोधात काही करू शकणार नाही अस वारंवार आव्हान दिलं गेलं. चौकशी चालू असताना या अधिकाऱ्यानं सरसकट चुकीच्या मान्यता दिल्या.”
13 वर्षे एकाच खात्यात काम
संदीप सांगवे हा अधिकारी 13 वर्षे एकाच खात्यात आहे. माझ्याविरोधात प्रश्न विचारू नका, तुमचं सगळं काम करून देतो अशी थेट ॲाफर करतो. हा इतका पावरफुल अधिकारी कसा काय? असा प्रश्न यावेळी संजय उपाध्यय यांनी विचारला.
संदीप सांगवे हा अधिकारी अख्खी विधानसभा ताब्यात घेण्यासाठी दोन-पाच कोटी घेऊन फिरतोय अशी चर्चा सुरू आहे असा गौप्यस्फोट यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी केला. त्यावर एका आठवड्याच्या आत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल असं शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले. या उत्तरावरून सभागृहात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.
काय म्हणाले दादा भुसे?
या प्रकरणाची चैकशी करण्यासाठी आयएस अधिकारी , आयपीएस आणि शिक्षण तज्ञ यांची एसआयटी स्थापन करुन चौकशी केली जाईल. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. तोपर्यंत संबधित अधिकारी संदीप सांगवेला निलंबित करण्यात येत आहे.