खासदार उदयनराजे भोसले यांची सरकारवर जोरदार टीका, म्हणाले ‘सरकार काय बोळ्याने दूध..’

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार होणाऱ्या अवमानावरून उदयनराजे भोसले यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. तसेच सर्व पक्षातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन एक विशेष अधिवेशन बोलवावं आणि तात्काळ कायदा पारित करावा, अशी मागणी देखील त्यांनी केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वारंवार आक्षेपार्य विधाने केली जातात, या मुद्यांवर बोलताना सरकार काय बोळ्याने दूध पितं का?, असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

उदयनराजे भोसले काय म्हणाले?
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केली जातात, या विरोधात सरकारने कडक कायदा करण्याची मागणी उदयनराजे भोसले यांनी केली. तसेच हा कायदा पारित करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केली. या संदर्भात बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले की, “माझं असं म्हणणं आहे की जर त्यांनी विशेष अधिवेशन बोलावलं नाही तर याचा अर्थ असा होईल की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान व्हावा ही त्यांची सर्वांची इच्छा दिसते. मग लोकांनी यांना त्यांची जागा दाखवून द्यावी”, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं.

‘बोळ्याने दूध पितात का?’
तुम्ही ज्या पक्षाचे खासदार आहात, त्याच पक्षाचे सरकार आहे, त्याच पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. मग मुख्यमंत्री तुमचं ऐकत नाहीत असं तुम्हाला वाटतं का? असा सवाल माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला, यावर उदयनराजे भोसले म्हणाले की, “एक लक्षात घ्या, वारंवार किती वेळा सांगायचं? एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं. त्यांना सर्वांना कळायला हवं ना? ते काय बोळ्याने दूध पितात का? जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान होतो तेव्हा त्यांना दिसत नाही का? दंगली होतात, अनेकांचे प्राण जातात. याला कारणीभूत कोण? जर तुम्ही कायदा पारित केला नाही तर हेच सर्व यासाठी जबाबदार आहेत”, असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी टीका केली.
वाघ्या कुत्र्याच्या समाधी संदर्भातील तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केली नाही, असा प्रश्न विचारण्यात आला असता यावर खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, “वाघ्या, वाघ्या, कोण वाघ्या? येथे एकच वाघ होऊन गेले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. तसेच वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत एक इतिहासकारांची समिती नेमली पाहिजे. मग ती समाधी तिथे कधी आली? का आली? इतिहासात तर अशी नोंद नाही. काहीका असेना. पण त्या माध्यमातून योग्य तो निर्णय घ्यावा”, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

‘शासन मान्य इतिहास का प्रकाशित झाला नाही?’

“छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना तुम्ही आधारस्तंभ मानता ना? मग अजून त्यांचा शासन मान्य इतिहास प्रकाशित का झाला नाही? अनेक महापुरुषांचा शासन मान्य इतिहास मान्य झाला. पण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनाच विसरलात?”, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं. “तसेच मराठ्यांच्या ज्या राजधान्या होत्या, राजगड असेल किंवा रायगड, सातारा, यासाठी एक शिव स्वराज्य सर्केट स्थापन केलं पाहिजे”, अशी मागणी देखील उदयनराजे भोसले यांनी केली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *