राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना मंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत मोबाईलवर रमी खेळत होते. त्याचा व्हिडीओ रोहित पवारांनी पोस्ट केला होता. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांनी सरकारवर दबाव टाकला होता. परंतु कोकाटे यांचा राजीनामा न घेता फक्त त्यांच्या खात्यामध्ये बदल करण्यात आला आहे.
दत्तात्रय भरणे कृषिमंत्री
माणिकराव कोकाटे यांच्या खातेबदलाची चर्चा सुरू होती. आता त्यांच्याकडील खाते हे दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे असलेले क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आलं आहे.
माणिकराव कोकाटे यांनी या आधीही शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्यं केली होती. ती त्यांना भोवण्याची चिन्हं होती. पण सध्या तरी त्यांचे फक्त खाते बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात शेतकरी संकटात असतानाही कृषिमंत्री असलेले माणिकराव कोकाटे हे विधानसभेत रमी खेळताना दिसले. असं असतानाही त्यांचा राजीनाम न घेता फक्त त्यांच्या खात्यात बदल करण्यात आला. खाते बदलले ही काही कारवाई आहे का असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारला. आता रमी खेळाला राज्य खेळाचा दर्जा द्या अशी खोचक मागणी त्यांनी केली. यापुढे मंत्र्यांना, सत्ताधाऱ्यांना पत्ते घेऊन सभागृहात येण्याची जाहीर परवानगी द्यावी अशीही मागणी त्यांनी केली.
राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याने या आधी राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिंदेंच्या एखाद्या मंत्र्याने राजीनामा दिल्याशिवाय राष्ट्रवादीचा दुसरा मंत्री राजीनामा देणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली.
माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा हेच समाधान
माणिकराव कोकाटे यांनी या आधीही शेतकऱ्यांबद्दल बोलताना अकलेचे तारे तोडले आहेत. विधानसभेत रमी खेळतानाही त्यांचा राजीनामा न घेता फक्त खातं बदललं. माणिकराव कोकाटे यांना फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे काही गुपित माहिती आहे का असं विचारल राजू शेट्टींनीही या निर्णयावर टीका केली. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला तरच महाराष्ट्राचं समाधान होईल असं शेट्टी म्हणाले.