उद्या मुंबईतील तिन्ही लोकल मार्गांवर मेगाब्लॉक,काय असणार वेळ?

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

रविवारी मुंबईतील तिन्ही लोकल मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. या मेगाब्लॉकमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण, पश्चिम रेल्वेवर दिवसभरात मेगाब्लॉक नाही.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत रविवारी लोकल रेल्वे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण वीकेंडला लोकल रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉकची माहिती समोर येत आहे. उपनगरातील रेल्वे मार्गांच्या देखभालीसाठी 1 डिसेंबरला हा मेगाब्लॉक घेण्यात येत असल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात येत आहे. तसेच, पश्चिम रेल्वेवर कोणताही मेगाब्लॉक नसल्यामुळे हा मार्ग दिवसभराच्या प्रवासासाठी खुला राहणार आहे. तसेच रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेशी संबंधित तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी हा मेगाब्लॉक घेण्यात येत असल्याची माहिती मुंबई लोकल रेल्वे विभागाकडून प्राप्त झाली आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते विद्याविहार अप-डाऊन धीम्या मार्गावर आणि हार्बर मार्गाच्या पनवेल ते वाशी अप-डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. या वेळी या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना रविवारी त्रास होऊ शकतो.

सीएसएमटी ते विद्याविहार अप-डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.25 पर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत सीएसएमटीहून सुटणाऱ्या धीम्या गाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन एक्सप्रेस मार्गावरून वळवण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शिव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकातून अप मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपरहून सुटणाऱ्या यूपी स्लो गाड्या विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान यूपी फास्ट मार्गावर वळवण्यात येतील. तर, कुर्ला, शिव, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात ते थांबवण्यात येणार आहे.

पनवेल-वाशी अप-डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. अप हार्बर मार्गावरील पनवेल किंवा बेलापूर ते सीएसएमटी आणि डाउन हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर या मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहे. पनवेलहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर आणि डाऊन मार्गावरील सेवाही रद्द करण्यात आल्या आहे. या काळात सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान ठाणे-वाशी किंवा नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.

तसेच मरीन लाईन्स ते माहीम डाऊन या धीम्या मार्गावर उद्या सकाळी 12.15 ते पहाटे 4.15 पर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत चर्चगेट ते माहीम स्थानकांदरम्यानच्या सर्व डाऊन स्लो मार्गावरील गाड्या डाऊन एक्सप्रेस मार्गावरून धावतील. त्यामुळे या गाड्या महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड आणि माहीम स्थानकावर थांबणार नाहीत. वास्तविक, महालक्ष्मी, प्रभादेवी, माटुंगा स्थानकांवर फलाट उपलब्ध नसल्यामुळे आणि लोअर परळ आणि माहीम स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची अपुरी लांबी यामुळे या गाड्या येथे थांबू शकणार नाहीत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *