शरद पवार यांचा सन्मान मी करतो, पण त्यांनी या वयात खोटारडेपणा करू नये. पराभव झाला तर स्वीकारायला हवा होता. जनतेला पुन्हा कनफ्युज करण्याचं आणि अपयश लपवण्याच काम ते करत आहेत. विधानसभेत प्रचंड मोठा पराभव करत जनतेने त्यांना नाकारलं. म्हणून आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकामुळे हे सारं करत आहेत. जाणीवपूर्वक महाराष्ट्र पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनवर दोष देऊन अपयश लापवण्याचे काम करत आहेत. मात्र, कितीही नौटंकी केली तरी महाराष्ट्र याला कंटाळला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याला विकास हवा आहे. मात्र मविआ संविधानाचा अपमान करत असल्याचा घाणघात करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) विरोधकांवर सडकून टीका केली आहे.
विधानसभेला आलेले अपयश लपवण्याचे काम शरद पवार करत आहेत. राज्यात प्रथमच ईव्हीएम मशीनवर निवडणुका झाल्या नाहीत. लोकसभेत मविआला काही ठिकाणी यश आले. त्यांचे 31 खासदार निवडून आले. त्या खासदारांनी राजीनामे द्यायला हवे आहेत. आक्षेप आहे तर मग सर्वांनी राजीनामा द्या अशी टीका करत चंद्रशेखर बावनकुळेंनी मागणी केली आहे. आम्ही पण पराभव झालो, मात्र त्यातून आम्ही शिकलो आणि पुढे गेलो. या वयात किती खोटेपणा कराल, असा सवालही त्यांनी शरद पवार यांना केला आहे.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
“शरद पवार गटाची विधानसभा निवडणुकीतील मतं 72 लाख आहेत. मात्र, आमचे उमेदवार 10 निवडून आलेत. अजित पवारांचे 58 लाख मतं आहेत, त्यांचे 41 उमेदवार निवडून आले आहेत. 80 लाख मत मिळालेल्या पक्षाचे 15 तर 79 लाख मतं मिळालेल्या पक्षाचे 57 आमदार निवडून येतात. असं कॅलक्यूलेशन आहे, आम्ही याच्या खोलात गेलेलो नाही. जोपर्यंत आमच्याकडे आधार नाही, तोपर्यंत याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. मात्र, मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत”, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. ते कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
विधानसभा निवडणुकीत वातावरण अनुकूल होतं पण निकाल अनुकूल लागला नाही. ईव्हीएमबाबत माझ्याकडे अधिकृत आकडेवारी नाही, त्यामुळं यावर आताच बोलता येणार नाही. महायुतीकडे बहुमत आहे हे मान्य केलं पाहिजे. मतांचे आकडे हे आश्चर्यकारक आहेत. काँग्रेस पेक्षा शिंदे यांना मतं कमी आहेत पण त्यांचे जास्त आमदार निवडून आलेत. ईव्हीएम बाबत शंका घेण्याचं कारण नाही. काही ठिकाणी भाजपचा पराभव देखील झाला आहे. पण मोठी राज्य भाजपकडे गेली आहेत, असंही पवार यांनी सांगितलं. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, निवडणूक प्रक्रिया संपली आहे. मारकडवाडी इथं बंदी घालण्याचं कारण काय? त्या गावातील लोकांना पहायचं होतं की मतं कुणाला किती पडली. त्यामुळे आम्ही आता ठरवलं आहे की त्या गावातील लोकांचं काय म्हणणं आहे. आम्ही एकत्रपणे येणाऱ्या सर्व निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. पराभव झाला म्हणून नाराज व्हायचं नाही. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांचे म्हणणे आहे की महाविकास आघाडी सोबत पुढे जायचं.