मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून विधानसभा निवडणूक लढवण्यावर जरांगे यांच्याकडून चर्चा केली जात होती. त्यांनी 3 ऑक्टोबर रोजी कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार, याची माहिती दिली होती. तसेच कोणत्या जागेवरील उमेदवार पाडण्याचे काम करायचे याबाबतही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आज जरांगे यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी एकाही जागेवर उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आवाहन
मनोज जरांगे यांनी आज (4 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आज विधानसभा निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका जाहीर केली. “आम्ही रात्री साडेतीनपर्यंत चर्चेला बसलो होतो. आम्ही या निवडणुकीत मित्रपक्षांसोबत दलित आणि मुस्लीम उमेदवार उभे करणार होतो. कारण, एका जातीच्या जोरावर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. आम्ही राजकारणात नवखे आहोत. उमेदवार उभा करुन तो पडला तर जातीची लाज जाईल. त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय घेतला. त्यामुळे माझी सगळ्या मराठा उमेदवारांना विनंती आहे की, सगळ्यांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत. निवडणूक हा काही आपला खानदानी धंदा नाही. एका जातीच्या जोरावर निवडणूक जिंकणे शक्य नाही. एका जातीवर पुढे जाणे शक्य नाही, हे एकमताने ठरवण्यात आले. त्यामुळे आपण निवडणूक लढायची नाही, असा निर्णय घेण्यात आला. फक्त उमेदवार पाडायचे,” असे आमच्या बैठकीत ठरल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
राजकीय प्रक्रिया हाताळणं सोपी गोष्ट नाही- जरांगे
एका जातीवरून कोणीही निवडून येऊ शकत नाही. माझं एवढं राजकीय आकलन आहे. एवढे ताकदवान पक्षांनाही एकत्र यावं लागलं. राजकीय प्रक्रिया हाताळणं ही साधी गोष्ट नाही. मी तर या राजकीय प्रकरणात लेकरू आहे. आंदोलनात हजार पाचशे लोक असले तरी चालून जातं. मात्र राजकारणात लोकांची गोळाबेरीज करावी लागते, असेही जरांगे यांनी सांगितले.
राज्यात आता पुढे काय होणार?
दरम्यान, जरांगे यांच्या या भूमिकेनंतर राजकीय गणित बदलणार आहे. निवडणूक लागण्यापूर्वी जरांगे यांनी निवडणुकीत सक्रियपणे उतरण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी बदलत्या राजकीय समिकरणाचा विचार करून आपली रणनीती आखली होती. मात्र त्यांनी आता थेट निवडणुकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता पुढे काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.