किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून प्रेयसीचा गळा आवळून तिची हत्या

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

प्रेम प्रकरणातून हत्या किंवा बलात्कारासारख्या गंभीर घटना सातत्याने समोर येत आहेत. आता, डोंबवली (Dombivali) शहरातील टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 22 तारखेला एका इमारतीमधील घरात तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी (Police) या प्रकरणी तपास सुरू केला, काल या मयत तरुणीच्या नातेवाईकांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात तरुणीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर, कल्याण क्राईम ब्रांचने प्रियकर सुभाष भोईर याला कल्याण दुर्गाडी पुलाच्या परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. सुभाष भोईर हा या तरुणीसोबत गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. काही महिन्यांपासून या दोघांमध्ये व्यक्तिगत वाद सुरू होते, त्याच वादातून सुभाषने तरुणीचा गळा आवळून तिची हत्या केली आणि तेथून पळ काढल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक अजित शिंदे यांनी दिली. विशेष म्हणजे कल्याण क्राईम ब्रांचने अवघ्या 20 तासात आरोपी सुभाषला बेडा ठोकल्या.

ठाकुर्ली येथील सुभाष भोईरचे मृत तरुणीशी प्रेमसंबंध होते, त्यातूनच दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या तीन वर्षापासून हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होत होते. 22 तारखेला या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला, त्यामुळे संतापलेल्या सुभाष भोईर याने या तरुणीचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने घरातून पळ काढला. याप्रकरणी घरात तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. टिळक नगर पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल करत पुढील तपास सुरू केला.

विशेष म्हणजे आठवडाभराने मयत तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार टिळक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. कल्याण क्राईम ब्रँच देखील या प्रकरणी समांतर तपास करत होती. या तरुणीचा प्रियकर सुभाष भोईर याच्यावर कल्याण क्राईम ब्रांचला संशय होता. मात्र, सुभाष भोईर पसार झाला होता, अखेर तांत्रिक तपास व खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सुभाष भोईर हा कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी ब्रिजजवळ आल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांचच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रांचने दुर्गाडी किल्ला परिसरात सापळा रचत सुभाष भोईर याला बेड्या ठोकल्या. दरम्यान, सुभाष भोईर हा पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्यापूर्वीच कल्याण क्राईम ब्रँच पथकाने त्याला अटक केली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *