दादर रेल्वे स्थानकात (Dadar Station) पादचारी पुलावरुन निघालेल्या 19 वर्षीय मुलीचे केस कापल्याप्रकरणी एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. शासकीय रेल्वे पोलिसांनी (GRP) मंगळवारी ही कारवाई केली. त्याच्यावर विनयभंगाचा ( Molestation Case) आरोप आहे. या प्रकारानंतर स्थानिक रहिवाशांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अटक केलेल्या इसमाने मुलीचे केस का कापले? त्याने कोणत्या रागातून हे कृत्य केले की तो मनोरुग्ण आहे की, त्याच्यासोबत इतरही काही लोक असून तो एका कटाचा भाग आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपीस अटक केली असून त्याच्याकडे चौकशी सुरु आहे.
काय घडले नेमके?
प्राप्त माहितीनुसारर, पीडित तरुणी दादर रेल्वे स्थानकावरील मधल्या पादचारी पुलावर मध्य रेषेवरून पश्चिम रेषेकडे चालत निघाली होती. दरम्यान, तिला कोणीतरी तिचे केस पकडत असल्याचे जाणवले. वळून पाहिल्यावर तिच्या लक्षात आले की, तिचे डोक्याचे एका बाजूचे केस कापले गेले आहेत. या प्रकारामुळे तरुणीस मोठा धक्का बसला. तिने तातडीने दादर येथील रेल्वे सुरक्षा दलाला (RPF) या घटनेची माहिती दिली. तरुणीने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तसेच, तिस जीआरपीकडे तक्रार दाखल करण्यास सांगितले.
तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन रेल्वे सुरक्षा दलाने तरुणीसोबत झालेल्या शारीरिक संपर्काचा हवाला देत अज्ञात इसमाविरुद्ध विनयभंगाच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केली. पोलिसांनी तपासलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती सदर मुलीच्या दिशेने तिच्या जवळ आल्याचे पाहायला मिळाले आहे.
संशयिताला अटक
पोलिसांनी याच पूलावर बारकाईने नजर ठेवली. त्यानंतर जीआरपीला सीसीटीव्ही फुटेजमधील वर्णनाशी जुळणारा एक संशयीत आढळून आला. पलिसांनी त्यास ताब्यात घेऊन अटक केली आहे. दरम्यान, त्याच्याकडे केलेल्या चौकशीत आढळून आले आहे की, सदर व्यक्ती चेंबूर येथील रहिवसी आहे. तो एका खासगी कंपनीत काम करतो. त्याने दावा केला आहे की, तो पीडित तरुणीला ओळखत नाही. पोलिसांनी मात्र त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले.
ऑगस्ट 2023 मध्येही साधर्म्य असलेली घटना
दरम्यान, ऑगस्ट 2023 मध्ये नोंदवलेल्या अशाच प्रकारच्या घटनेत संशयिताचा सहभाग होता का याचा तपास जीआरपीचे अधिकारी करत आहेत. त्या प्रकरणात, एका 42 वर्षीय महिलेने त्याच पादचारी पुलावर तिचे केस कापले गेल्याची तक्रार केली होती. सी. सी. टी. व्ही. फुटेज तपासल्यानंतरही त्या वेळी गुन्हेगार ओळखता आला नाही.
जीआरपीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “2023 च्या प्रकरणाशी त्याचा संबंध आहे का हे शोधण्यासाठी आम्ही संशयिताची चौकशी करत आहोत. दोन्ही घटनांमध्ये कोणतीही चोरी किंवा इतर गुन्ह्यांची नोंद न झाल्याने या कृत्यांचा हेतू अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, या घटनांमुळे महिला प्रवाशांमध्ये सुरक्षेची चिंता निर्माण झाली आहे, ज्यामुळे अधिकाऱ्यांना दादरसारख्या गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर पाळत ठेवणे आणि सुरक्षा वाढविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.