महाराष्ट्राला जागतिक ‘फिनटेक’ व कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) राजधानी बनविण्याबरोबरच ५० लाख महिलांना लखपती दीदी, १० लाख नवीन उद्योजक, २५ लाख रोजगारनिर्मिती, १० लाख विद्यार्थ्यांना दरमहा १० हजार रुपये, अक्षय अन्न योजनेत कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना मोफत शिधा आदी आश्वासने भाजपच्या ‘संकल्प पत्रा’त देण्यात आली आहेत.
भाजपच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी झाले. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. महायुतीच्या दशसूत्री व्यतिरिक्त शेकडो आश्वासने भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिली आहेत. सोयाबीन, कापूस व अन्य उत्पादनांना किमान आधारभूत किमतीनुसार भाव मिळावा आणि त्यापेक्षा कमी दर बाजारपेठेत मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार शेतकऱ्यांना देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. महाराष्ट्र २०२७ पर्यंत डाळ उत्पादनात आत्मनिर्भर करण्यासाठी प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येतील. शेती उत्पादने निर्यातक्षम करण्यासाठी पॅकिंग हाऊसची उभाणी करून साठवण क्षमता व प्रक्रिया सुविधा तयार केल्या जातील. शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतांवरील एसजीएसटी अनुदान स्वरूपात परत करण्यात येईल, अशी अनेक आश्वासने भाजपच्या जाहीरनाम्यात येण्यात आली आहेत.
जाहीरनाम्यातील मुख्य आश्वासने :
– प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र
– अनुसूचित जाती, जमाती व ओबीसी उद्योजकांना १५ लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज
– कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी यांत्रिक कृषी अभियान, ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर
– महाराष्ट्र दुग्ध विकास अभियानांतर्गत २०३० पर्यंत दूध उत्पादन क्षमता ३०० लाख मेट्रिक टनांपर्यंत
– जळगाव, अमरावती, नांदेड व सोलापूर हे नवीन औद्याोगिक जिल्हे, सोलापूरमध्ये फूड पार्क
– विदर्भ-मराठवाडा संरक्षण सर्किट कॉरिडॉर
– नवी मुंबईतील नयना प्रकल्पात एज्युसिटी, जागतिक पातळीवरील शिक्षण संस्थांना प्रोत्साहन
– खेळाडूंना आरोग्यविमा आणि आरोग्य कार्ड, सर्व विद्यापीठांमध्ये क्रीडा विज्ञान पदवी अभ्यासक्रम
– कोल्हापूरला जागतिक दर्जाचे फुटबॉल स्टेडिअम, नांदेडमध्ये अत्याधुनिक हॉकी स्टेडिअम
– प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात २०२९ पर्यंत डायलिसीस केंद्र, अतिदक्षता विभाग व ऑपरेशन थिएटर
– प्रत्येक पार्थिवावर सन्मानजनक अंत्यविधीसाठी उपाययोजना
– प्रत्येक गावातील २५ टक्के घरांना पाच वर्षांत सौर ऊर्जा
– ४०० वर्षांहून अधिक जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार
– ओबीसी, सामाजिक व आर्थिक दुर्बल घटक, भटक्या व विमुक्त जातीतील विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षाशुल्काची १०० टक्के प्रतिपूर्ती
– शिक्षक व पोलीस दलातील रिक्त जागा भरण्यासाठी महाभरती
– सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये क्रीडा केंद्र
– सर्व शासकीय शाळांमध्ये अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा
– महारथी योजनेअंतर्गत रोबोटिक्स आणि महाविद्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली
– राज्यात ५० अत्याधुनिक कला स्टुडिओ
– डॉ. पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानात २०२९ पर्यंत सेंद्रिय शेतीचे क्षेत्र २५ लाख हेक्टरपर्यंत वाढविणे
– सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी गडकिल्ले विकास प्राधिकरण
– कौशल्य जनगणना, उद्याोगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन
– अर्थव्यवस्था २०२८ पर्यंत एक लाख कोटी डॉलर नेण्याचे उद्दिष्ट
– कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ – नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिकला एरोनॉटिकल व स्पेस उत्पादन केंद्र