महाराष्ट्र सरकारने दारूवरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीत १४,००० कोटी रुपयांचा महसूल वाढेल. पण त्याचबरोबर दारूप्रेमींच्या खिशालाही कात्री लागणार आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या एका मोठ्या निर्णयात, सरकारचा महसूल वाढविण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने दारूवरील शुल्क वाढवले आहे. यामध्ये मेड इन इंडिया फॉरेन लिकर (IMFL) वरील शुल्कात १.५ टक्के वाढ करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंगळवारी उत्पादन शुल्क विभागात महसूल वाढवणारे बदल मंजूर केले, ज्यात दारूवरील शुल्कात वाढ आणि नवीन कार्यालये आणि पदे निर्माण करणे समाविष्ट आहे.आता प्रत्येक ब्रँडनुसार १८० मिली दारूची किरकोळ किंमत बदलेल. यामध्ये, देशी दारूची किमान विक्री किंमत ८० रुपये असेल, तर महाराष्ट्रात उत्पादित दारूची १४८ रुपये असेल, तर भारतात उत्पादित परदेशी दारूची किमान विक्री किंमत २०५ रुपये असेल आणि प्रीमियम ब्रँडच्या परदेशी दारूची ३६० रुपये असेल. प्रत्येक ब्रँडनुसार किंमत बदलेल.