लेखणी बुलंद टीम:
छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थान राखण्यासाठी सध्या मोठी चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक नवनवीन मालिका ‘स्टार प्रवाह’, ‘झी मराठी’, ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. तर, अनेक मालिकांचा कमी टीआरपीमुळे अवघ्या काही महिन्यांतच गाशा गुंडाळण्यात आला. मालिकेत येणारं रंजक वळण, नवीन पात्रांची एन्ट्री, दमदार कथानक या गोष्टींमुळे प्रेक्षकवर्ग आकर्षित होत असतो. आता या आठवड्यात टेलिव्हिजन टीआरपीमध्ये कोणी बाजी मारली पाहुयात…
गेल्या दीड वर्षांपासून ‘स्टार प्रवाह’ची ‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. याशिवाय टॉप-१० मध्ये देखील ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या मालिकांचा दबदबा पाहायला मिळतो. परंतु, या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’च्या भाऊच्या धक्क्याला ( शनिवार – रविवार ) टॉप-१० मध्ये नववं स्थान मिळालं आहे. तर ‘बिग बॉस मराठी’चे सोमवार ते शुक्रवार दरम्यान प्रदर्शित होणारे एपिसोड २.९ रेटिंगसह या आठवड्यात १२ व्या स्थानावर आहेत.
शिवानी सुर्वेच्या मालिकेने या आठवड्यात टीआरपीच्या यादीत मोठी झेप घेतली आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून ही मालिका चौथ्या स्थानावर होती. परंतु, या आठवड्यात ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेने टीआरपीच्या ( TRP ) यादीत ‘प्रेमाची गोष्ट’ आणि ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकांना मागे काढत दुसरं स्थान पटकावलं आहे.
TRP च्या शर्यतीमधील टॉप – १५ मालिका
१. ठरलं तर मग
२. थोडं तुझं आणि थोडं माझं
३. लक्ष्मीच्या पाऊलांनी
४. प्रेमाची गोष्ट
५. येड लागलं प्रेमाचं
६. घरोघरी मातीच्या चुली
७. अबोली
८. साधी माणसं
९. बिग बॉस मराठी – भाऊचा धक्का
१०. शुभविवाह
११. मन धागा धागा जोडते नवा
१२. बिग बॉस मराठी ( सोमवार-शुक्रवार )
१३. साधी माणसं – महाएपिसोड
१४. लग्नाची बेडी – महाएपिसोड
१५. पारू
‘झी मराठी’च्या ‘पारू’ या फक्त एका मालिकेला टॉप-१५ च्या यादीत स्थान मिळालं आहे. याशिवाय टॉप – १५ मध्ये ‘बिग बॉस मराठी’ वगळता इतर सर्व मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या आहेत. आता येत्या काळात ‘स्टार प्रवाह’वर छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिस पुनरागमन करणार आहे. त्यामुळे तिच्या कमबॅकनंतर या टीआरपीच्या यादीत मोठे उलटफेर पाहायला मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे. तर, बिग बॉस मराठीचा टीआरपी वाढल्याने रितेश देशमुखचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.