बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नगद नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांनी दसऱ्याच्या सभेच्या सुरूवातीलाच विरोधकांवर हल्ला केला. त्यांनी कुणाचे नाव घेतले नाही. पण या गडावर इतकी गर्दी होईल, असे वाटले नव्हते. अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली. त्यांनी मीडियाला विनंती केली की ही गर्दी दाखवा. त्याचं दातडं पडू द्या. त्यांना आता ही गर्दी पाहून रुग्णालयचं जवळ करावं लागेल, असा चिमटा जरांगे पाटील यांनी काढला.
गर्दी पाहून त्यांचा कार्यक्रम
प्रथम या जनसमुदायाच्या चरणी मी मनापासून नतमस्तक होत आहे. खरंच वाटलं नव्हतं एवढी गर्दी होईल. मी खोटं बोलत नाही. अर्ध्याच्यावर लोकं सरकारी दवाखान्यात जातील. नजर जाईल एवढे लोकं येतील असं खरंच वाटलं नव्हतं. मला एकजण म्हणाला, ह्यँ ह्यँ केलं. ५०० एकर असतं का कुठं असं म्हणत होता. आता तो दिसत नाही. मी मीडियाला कधीच विनंती केली नाही. पण आता करतो. चारही बाजूला कॅमेरे फिरवा. तुम्ही फ्रेम दिले असले तरी एकदा मात्र हा जनसमुदाय राज्याला दिसू द्या. कानाकोपऱ्यातील बांधव दिसू द्या. एकदा दाखवाच. नुसती गर्दी पाहूनच त्यांचा कार्यक्रम होईल, असे जरांगे पाटील म्हणाले.
पाडळशिंगी पर्यंत चारही मार्ग लॉक आहेत. बीडमध्ये सर्व रस्ते जाम आहेत. कधी वाटलं नव्हतं आपण या ताकदीने एकत्र याल म्हणून. हा जनसमुदाय न्यायाचा आहे. एका दुखाकडून सुखाकडे जायचं आहे. या समुदायावर संस्कार आहेत. संस्कार. ते संस्कार कधीच जातीवाद करत नाहीत. प्रचंड ताकदीने असणारा हा समुदाय आहे. या राज्यावर समुद्रासारखा पसरला आहे. पण कधीच मस्तीत आणि मग्रुरीत हा समाज वागत नाही. कधीच हा समुदाय मस्तीत आणि मग्रुरीत वागला नाही. प्रत्येकाला सांभाळण्याचं, साथ देण्याचं काम केलं आहे. यांनी कधी जातीवाद केला नाही. त्यांना कधी जात शिवली नाही, असे ते म्हणाले. या सभेला राज्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने मराठा बांधव आले आहेत.