मुंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळी परिसरात शनिवारी पहाटे दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे विक्रोळीतील (Vikhroli News) पार्कसाईट या डोंगराळ परिसरात दरड कोसळली. पार्कसाईट (Parksite) या परिसरातील डोंगरावर मोठी झोपडपट्टी आहे. याठिकाणी डोंगरावर अनेक घरे आहेत. अनेक भागांमध्ये संरक्षक भिंत बांधूनही प्रत्येक पावसाळ्यात याठिकाणी दरड कोसळण्याचा (Landslide) धोका असतो. शनिवारी पहाटे ही भीती खरी ठरली. या दुर्घटनेत मिश्रा कुटुंबीयांची घर दरडीखाली गाडले गेले. यामध्ये मिश्रा कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर चौघांवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास मिश्रा कुटुंबांच्या घरावर दरड कोसळली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि पालिकेचे अधिकारी याठिकाणी दाखल झाले. बचावकार्यानंतर मिश्रा कुटुंबीयांना दरडीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. मात्र, सुरेश मिश्रा (वय 50) आणि शालू मिश्रा ( वय 19) या बापलेकीचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाला. तर आरती मिश्रा (वय 45) आणि ऋतुराज मिश्रा (वय 20) या आई आणि मुलावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
यंदाच्या पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेने पार्कसाईटच्या डोंगराळी भागात दरड कोसळण्याचा धोका असल्याने काही परिसर धोकादायक घोषित केला होता. मिश्रा कुटुंबाला पालिकेने घर सोडायला सांगितले होते. मात्र, मिश्रा कुटुंब तिकडेच वास्तव्याला होते. या दुर्घटनेनंतर आता पालिकेकडून दरड कोसळलेल्या आजुबाजूच्या भागातील घरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. आज हवामान खात्याने मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोंगराची माती भुसभुशीत होऊन आणखी एखादी दुर्घटना घडू नये, यादृष्टीने पालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे.
ल्वेमार्गावर ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात
मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मध्य रेल्वेमार्गावरील विद्याविहार आणि कुर्ला या स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे रुळ पूर्णपणे पाण्याखाली जाऊ शकतात. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. याशिवाय, दादर परिसरातही रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे.