जाणून घ्या मलेरियाचा हृदयावर कसा परिणाम होतो? नेमकी लक्षणे काय?

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

मलेरिया (Malaria) म्हणजे खूप ताप येणे आणि थंडी वाजणे हे सगळ्यांनाच माहित आहे. मात्र, मलेरिया हा केवळ ताप येणारा आजार नसून तो तुमच्या हृदयावर आणि रक्तवाहिन्यांवरही परिणाम करू शकतो हेही तितकंच खरं आहे. थंडी वाजणे आणि थकवा जाणवणे तसेच तुमच्या हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधित प्रणालीवर प्रचंड ताण निर्माण होऊ शकतो.

या संदर्भात मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील कार्डियाक सर्जन डॉ. बिपीनचंद्र भामरे, यांनी महत्त्वाची माहिती सांगितली आहे. ते म्हणतात, मलेरिया हा एक गंभीर आजार आहे जो प्रामुख्याने प्लाझमोडियम परजीवींमुळे होतो. तो बहुतेकदा संक्रमित अ‍ॅनोफिलीस डास चावल्यावे पसरतो. उष्णकटिबंधीय प्रदेशात मलेरिया मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता असते. मलेरिया असलेल्यांना तीव्र ताप, घाम येणे, थंडी वाजणे, डोकेदुखी, मळमळ आणि पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही खूप थकवा जाणवणे अशी लक्षणे दिसून येतात.

मलेरियाची लक्षणं
बहुतेकदा, लोक केवळ तात्काळ दिसून येणाऱ्या लक्षणांकडे पाहतात. परंतु, मलेरियामुळे गंभीर गुंतागुंत देखील होऊ शकते ज्यावर उपचार न केल्यास ती घातक ठरू शकते. गंभीर प्रकरणांमध्ये हा संसर्ग तुमच्या शरीरात वेगाने पसरतो आणि यकृत, मेंदू आणि मूत्रपिंडांसारख्या महत्त्वाच्या अवयवांना नुकसान पोहोचवू शकतो. तुम्हाला माहिती आहे का मलेरिया तुमच्या हृदयाला हानी पोहोचवू शकतो? या विशिष्ट संसर्गामुळे जळजळ होऊ शकते, सामान्य रक्ताभिसरणात व्यत्यय येऊ शकतो आणि हृदय आणि रक्तवाहिन्यांवर ताण येऊ शकतो. हृदयरोग, उच्च रक्तदाब किंवा अशक्तपणा असलेल्या व्यक्तींना याबाबत विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण त्यांना मलेरियामुळे हृदयाशी संबंधित गुंतागुंत होण्याचा धोका अधिक असतो.

हृदय आणि रक्तवाहिन्यांवर कसा होतो परिणाम?
तुमच्या हृदयावर आणि रक्तवाहिन्यांवर मलेरिया सारख्या आजाराने गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे गंभीर गुंतागुंत देखील निर्माण होऊ शकते जे रुग्ण बरे झाल्यानंतरही काही काळ टिकून राहू शकते. यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका वाढू शकतो. तुमचे रक्त गोठू शकते आणि त्यामुळे धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होण्याचा धोका वाढतो. यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येऊ शकतो. मलेरियामुळे रक्तवाहिन्यांना सूज येऊ शकते, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी होते. यामुळे रक्त प्रवाह कार्यक्षमतेने होणे कठीण होऊ शकते.

गंभीर प्रकरणांमध्ये, मलेरिया लाल रक्तपेशी नष्ट करू शकतो, ज्यामुळे अशक्तपणा येतो. यामुळे तुमचे हृदय शरीरात पुरेसे ऑक्सिजन पुरवण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेगाने रक्त पंप करण्यास भाग पाडते आणि हार्ट फेल्युअरचा धोका वाढतो. मलेरियामुळे तुमच्या रक्तदाबाच्या पातळीत अचानक घट होऊ शकते ज्यामुळे हृदयासह महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा कमी होऊ शकतो. तुमच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवर जास्त ताण आल्याने अतालता (अनियमित हृदयाचे ठोके) होऊ शकते, ज्यामुळे धडधडणे, चक्कर येणे किंवा आणखी गंभीर गुंतागुंत होऊ शकते. म्हणूनच तुमच्या आरोग्याला प्राधान्य देणे आणि मलेरियासारखी लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *