न्यायमूर्ती संजीव खन्ना 11 नोव्हेंबर रोजी देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. ते देशाचे 51 वे सरन्यायाधीश असतील. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा कार्यकाळ 6 महिन्यांचा असेल व ते 13 मे 2025 रोजी निवृत्त होतील. न्यायमूर्ती संजीव खन्ना हे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांची जागा घेतील. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केली होती. सरकारने मावळत्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून मेमोरँडम ऑफ प्रोसिजरनुसार त्यांच्या शिफारसी पाठवण्यास सांगितले होते. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड दोन वर्षांच्या कार्यकाळानंतर 10 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत.
दरम्यान, न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा जन्म 14 मे 1960 रोजी झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून कायद्याचे शिक्षण घेतले. पदवीनंतर त्यांनी 1983 मध्ये दिल्ली बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी केली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनण्यापूर्वी ते 14 वर्षे दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. 2019 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली.