ठाणे रेल्वे स्टेशन नजिक असलेल्या एका दागिन्यांच्या दुकानात मोठी चोरी (Jewellery Shop Theft) झाली आहे. चोरट्यांनी या दुकानात असलेले सुमारे 7 कोटी रुपयांचे 6.5 किलो सोन्याचे दागिने चोरून (Thane Jewellery Shop Robbery) नेले. नौपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 1:30 ते पहाटे 4:00 वाजणेच्या दरम्यान ही घटना घडली. ज्वेलरी शॉपमध्ये झालेल्या जबरी चोरीमध्ये दोन इसमांचा समावेश असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले असून तपास सुरु आहे.
ज्वेलर्स व्यवस्थापनाच्या अक्षम्य चुका
दरोड्याचा तपशील सांगताना पोलिसांनी म्हटले की, ज्वेलरी शॉप मध्ये झालेली चोरी मोठी असली तरी, ज्वेलरी व्यवस्थापनाच्याही काही चुका आढळून आल्या आहेत. चोरांनी प्रथम पहिल्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून आणि नंतर जबरदस्तीने दुकानाचे शटर उघडून दुकानात प्रवेश केला. दरम्यान, आतल्या बाजूस त्यांना दागिगने काचेच्या फडतालांमध्ये तसेच उघडे असल्याचे आढळून आले. दुकान व्यपस्थापनाने रात्रीची वेळ असूनही हे दागिने तसेच उघड्यावर ठेवले होते. वास्तविक पाहता हे दागिने त्यांनी तिजोरीत बंद करुन सुरक्षीत ठेवायला हवे होते. पण, त्यांनी तसे केले नाही. व्यवस्थापनाने पारंपरिक सुरक्षा उपायांचा उपयोग केला नाही आणि निष्काळजीपणा दाखवला. त्यामुळे अशा प्रकारची चोरी अधिक जलद गतीने चोरट्यांना करता आल्याचे पोलिसांनी म्हटले.
गुन्हा दाखल तपास सुरु
पोलिसांनी पुढे बोलताना सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आणि चोरलेले सोने परत मिळवण्यासाठी अनेक तपास पथके तैनात करण्यात आली आहेत. अधिकारी सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत, स्थानिकांची चौकशी करत आहेत आणि गुन्हेगारांना ओळखण्यासाठी न्यायवैद्यक पुराव्यांचाही आधार घेतला जात आहे. ‘आमची पथके या अत्याधुनिक दरोड्याचे निराकरण करण्यासाठी सर्व संभाव्य माहितीचा मागोवा घेत आहेत आणि पुरावे गोळा करत आहेत’, असे अधिकाऱ्याने सांगितले.