जगदीप धनखड यांनी आपल्या उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. त्यांनी प्रकृतीचे कारण दाखवत आपला राजीनामा सादर केला. असे असतानाच आता सोशल मीडियावर एक दावा केला जात आहे. उपराष्ट्रपतींच्या बंगल्याला सिल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा दावा खोटा असल्याचे पडताळणीतून समोर आले आहे.
सोशल मीडियावर पसरलेली ही अफवा खोटी
राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड यांना लगेच उपराष्ट्रपतींचे शासकीय निवासस्थान रिकामे करण्याची सूचना करण्यात आल्याचे आणि उपराष्ट्रपतींचे निवासस्थान सिल करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र सोशल मीडियावर पसरलेली ही अफवा खोटी आहे. तशी माहिती पीआयबी फॅक्ट चेकने दिली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पीआयपी फॅक्ट चेकने केले आहे.
धनखड यांच्या सामानाची पॅकिंग चालू
मिळालेल्या माहितीनुसार उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड हे आठवड्याभरात उपराष्ट्रपतींसाठीचे शासकीय निवासस्थान सोडणार आहेत. सोमवारी रात्री त्यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. आरोग्याचे कारण देत त्यांना हा राजीनामा सोपवला आहे. नियमानुसार माजी उपराष्ट्रपतींना आयुष्यभर शासकीय निवासस्थान दिले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार सध्या उपराष्ट्रपतींच्या शासकीय निवासस्थानी धनखड यांच्या सामानाची पॅकिंग चालू आहे. त्यांच्यासाठीच्या नव्या घराची व्यवस्था केली जात आहे.
धनखड यांचे नवे घर कुठे असेल?
नियमानुसार जगदीप धनखड यांना सरकारतर्फे घर दिलं जाणार आहे. त्यांना ल्युटियन्स दिल्ली किंवा अन्य ठिकाणी व्हिआयपी VIII बंगला दिला जाऊ शकतो. टाईप VIII बंगला हा वरिष्ठ केंद्रीय मंत्री किंवा राष्ट्रीय पक्षांच्या अध्यक्षांना दिला जातो.