लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे धीरज विलासराव देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचाराला आता रंगत आली असून त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि सिनेस्टार रितेश देशमुख सुद्धा त्यांच्याकरता प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. रितेश देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत एक लाखांपेक्षा जास्त लीडने धीरज देशमुख यांना निवडून द्या, असं आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी लय भारी चित्रपटातील काही वाक्ये, तर बिग बॉसचा विजेता सुरज चव्हाण याचेही डायलॉग उपस्थित प्रेक्षकांना ऐकवले.
रितेश देशमुख म्हणाले, “हा जो जनसागर आहे, ती खरं म्हणजे लीड आहे. महिला मेळाव्यातच विजय निश्चित झाला होता. धीरज विलासराव देशमुख यांच्या लीडची ही सभा आहे. लय भारी कार्यक्रम धीरजने केला. खरं म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी असते, गेल्यावेळी भाषणात म्हणालो होतो की या गड्याला मतदान करा. १ लाख मतांनीतुम्ही मतदान केलं होतं. गेल्या ५ वर्षांपासून धीरजने प्रामाणिकपणे काम केलंय. लोकांसाठी काम करण्याची चळवळ. लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसायचे आहेत. आई बहिणींचा त्रास कमी करायचा आहे. लातूर पॅटर्नमध्ये युवक शिक्षण घेत आहेत. पण रोजगार आहे का तुमच्या हातात. हा रोजगार देण्याची जबाबदारी सरकारची आहे. आहे का तुमच्याकडे रोजगार. पिकपाण्याला भाव आहे का? असे प्रश्न विचारून त्यांना सरकारवर टीका केली.
“वर्षी १ लाखाची लीड होती, यावेळी एवढ्या जोरात बटण दाबा की पुढच्या वेळेचं डिपोझिट आत्ताच जप्त झालं पाहिजे. लोकसभेला जे वारं होतं, आता विधानसभेला झापूक झुपूक वारं झालेलं आहे. त्यामळे काहीही काळजी करू नका. आता समोर गुलिगत धोका आहे. सावधान राहा. त्या धोक्याला बळी पडू नका. आपला उमेदवार चांगला आहे. आता बुक्कीत नाही, बटणावर टेंगूळ द्यायची वेळ आलीय”, असं रितेश देशमुख म्हणाले.
पक्ष वाचवण्यासाठी धर्माला प्रार्थना
“कृष्ण म्हणाले होते की कर्म हाच धर्म आहे. कर्म करत राहणे म्हणजे धर्म करणे. जो प्रामाणिकपणे काम करतो, त्याला खरंच तो धर्म केल्यासारखा वाटतो. पण जे काम करत नाहीत, त्यांना धर्माची गरज पडते. सगळे म्हणतात की धर्म धोक्यात आहे, प्रत्येक पक्ष म्हणजे धर्म धोक्यात आहे. धर्म बचाव, धर्माला वाचवा, असं म्हटलं जातंय. आमचा धर्म प्रिय आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म प्रिय असलाच पाहिजे. खरं म्हणजे ते धर्माला प्रार्थना करतात की आमचा पक्ष धोक्यात आहे, आम्हाला वाचवा. काही गरज नाही अशा भुलथापांना बळी पडायची. तुम्ही सांगा धर्माचं आम्ही बघून घेतो, तुम्ही कामाचं सांगा. आमच्या पिक पाण्याला तुम्ही काय भाव देता हे सांगा. पण आमच्या आई बहिणी सुरक्षित आहेत की नाही ते सांगा”, असंही ते म्हणाले.