गेल्या काही दिवसांत मराठी-हिंदी वादामुळे राज्य ढवळून निघाले. जनता आणि विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे राज्य सरकारला इयत्ता पहिलीपासूनच्या हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला. याच हिंदी सक्तीमुळे आता मुंबई आणि उपनगरांत मराठीचा मुद्दा पुन्हा तापला आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींनतर आता पंढरपुरातून मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार केला जातोय. आता थेट मंदिरात हिंदीतून पूजा झाल्याचे समोर आल्यानंतर वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हिंदी भाषेतून पूजा करण्यात आल्याचा दावा केला जातोय. पूजेवेळी 30 ते 35 मराठी कुटुंब होते. मात्र फक्त एका कुटुंबासाठी हिंदी भाषेत पूजा करण्यात आली, असा दावा राहुल सातपुते नावाच्या व्यक्तीने एक्स या समाजमाध्यमाद्वारे केला आहे. हा दावा करताना सातपुते यांनी मोठी पोस्ट लिहिली असून मी हे प्रकरण लावून धरणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
चौकशी करून योग्य कारवाई
राहुल सातपुते यांनी पंढरपूर मंदीर समितीकडे यासंदर्भात तक्रार दिली आहे. या तक्रारीला मंदीर समितीने प्रतिसाद दिला आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करू. चौकशी करून आम्ही योग्य ती कारवाई करू, असे या मंदीर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच यापुढे मंदिरात मराठी भाषेतूनच पूजा केली जाईल, अशी माहिती पंढरपूर मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी टीव्ही 9 मराठीला दिली आहे.
पंढरपूरमधील तुलसी अर्चन पूजेचा अनुभव-आता महाराष्ट्राच्या आद्य दैवताच्या दरबारात देखील हिंदी सक्ती?पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती तर्फे तुलसी अर्चन पूजाचे आयोजन होते. माझ्या कुटुंबाने त्यात सहभाग घेतलेला. समितीच्या तुकाराम भुवनात साधारण ३०-३५ कुटुंबं पूजेसाठी जमली…
राजेंद्र शेळके यांनी नेमकी काय भूमिका मांडली?
पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठल आणि रुक्मिणीमातेची तुळशीपूजा होती. त्याचे सर्व स्त्रोत हे संस्कृत भाषेत असतात. मात्र तुळशीपूजा सुरू करण्यापूर्वी त्याची माहिती ही मराठी भाषेतून सांगितली जाते. परंतु 9 ऑगस्ट रोजी एक अमराठी कुटुंब आले होते. त्या कुटुंबाला आम्हाला याबाबतची माहिती हिंदी भाषेतून दिली जाईल का? अशी विचारणा केली होती. आपल्याकडे सर्व पूजा मराठीतूनच होतात. आपण हिंदी भाषेतून कुठलीही पूजा करत नाही. भाविकाला मराठी समजत नसल्यामुळे आपण फक्त पूजेची माहिती हिंदीतून दिली, असे राजेंद्र शेळके यांनी सांगितले.