पाच वर्षांखालील मुलांमध्येही जाणवतेय बध्दकोष्ठतेची समस्या? काय घ्याल काळजी?

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

आईवडिलांबरोबर हल्ली मुलांच्याही जीवनशैलीत (Lifestyle), त्यांच्या आहाराच्या (Food) सवयीत मोठ्या संख्येने बदल होत आहेत. आहाराच्या चुकीच्या सवयी, फायबरयुक्त अन्नाची कमतरता, पाणी कमी पिणे आणि नियमित शौचास न जाणे यामुळेही पाच वर्षांखालील मुलांमध्येही बध्दकोष्ठतेची (Constipation) समस्या सतावू लागली आहे. बद्धकोष्ठता ही मुले आणि पालक दोघांसाठीही अस्वस्थता, वेदनादायक आणि त्रासदायक ठरते, ज्यामुळे वेळीच निदान आणि उपचार करणं गरजेचं आहे.

या संदर्भात बोलताना पुण्यातील नवजात शिशु व बालरोग तज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्सचे बालरोग अतिदक्षता विभागाचे डॉ. अमर भिसे यांनी असं सांगितलं आहे की, बद्धकोष्ठता ही वैद्यकीय समस्या बदलती जीवनशैली आणि आहाराच्या चुकीच्या सवयींमुळे उद्भवते. या समस्येमुळे मल विसर्जनास संघर्ष करावा लागतो. प्रक्रिया केलेले अन्नाचे सेवन, आहारात फायबरची कमतरता असलेल्या किंवा पुरेसे पाणी न पिणाऱ्या मुलांमध्ये ही समस्या सर्रासपणे आढळून येते. मानसिक ताण, योग्य वयाच शौचालय प्रशिक्षण न मिळणे आणि वेदना किंवा भीतीमुळे शौचास टाळणे हे देखील या स्थितीस कारणीभूत ठरू शकते. जर वेळीच उपचार केले नाहीत तर, दीर्घकालीन बद्धकोष्ठतेमुळे गुदद्वारात भेग, पोटदुखी आणि भूक न लागणे यासारख्या गुंतागुंतीचा सामना करावा लागू शकतो.

डॉ. अमर पुढे सांगतात की, बध्दकोष्ठतेच्या लक्षणांमध्ये आठवड्यातून तीनपेक्षा कमी वेळा शौचास जाणे, कठीण किंवा वेदनादायक मल, पोट फुगणे आणि पोट रिकामे न झाल्याने चिडचिड होणे यांचा समावेश आहे. पालकांनी मुलांच्या मल विसर्जन सवयींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुमचे मुल मलविसर्जन करताना अस्वस्थ होत असेल, मल विलर्जन करताना वेदना होत असतील किंवा शौचास जाण्यास नकार देत असेल तर याकडे दुर्लक्ष करु नका. 10 पैकी 6 मुलांना मलविसर्जन करताना अस्वस्थता, पोट फुगणे आणि मलविसर्जन करण्यास असमर्थता येते. बद्धकोष्ठतेची समस्या ही 50% पेक्षा जास्त मुलांमध्ये आढळून येते. पालकांना मुलांच्या आहारात बदल करण्यासाठी फळे, भाज्या आणि कडधान्यातून फायबरयुक्त आहाराचे सेवन वाढवण्याचा, पुरेसे हायड्रेशनकरिता मुलांना प्रोत्साहन देण्याचा आणि नियमित शौचालयाचा वापर करण्याच्या सवयींचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो. काही मुलांना मलविसर्जन सुलभ करण्यासाठी वैद्यकीय देखरेखीखाली खास औषधांचा सल्ला दिला जातो. जेणेकरुन मल बाहेर पडण्यास त्रास होणार नाही.

मुलांमध्ये होणारी बद्धकोष्ठतेची समस्या टाळण्यासाठी ‘हे’ उपाय करा…
पालकांनी फायबरयुक्त आहाराचे सेवन करावे.
दैनंदिन जीवनात शारीरिक हालचालींना प्रोत्साहन द्यावे.
शौचालयाच्या दिनश्चर्येचे पालन करावे जेणेकरून आतड्यांचे आरोग्य चांगले राहील.
शौचालय प्रशिक्षणादरम्यान तणावमुक्त वातावरण तयार करणे आणि लक्षणे कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. वेळीच उपचार आणि जीवनशैलीतील बदलांसह, मुलांमध्ये बद्धकोष्ठतेच्या समस्येचे व्यवस्थापन केले जाऊ शकते आणि त्यांचे एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होईल असेही डॉ. अमर यांनी स्पष्ट केले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *