अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आता इराणने 36 तासांत बदला घेतला आहे. इराणने सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला केला आहे. सोमवारी इराणी माध्यमांनी सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला झाल्याची माहिती दिली. अमेरिकेच्या बी-2 बॉम्बर हल्ल्याच्या 36 तासांनंतर सीरियातील अमेरिकेच्या तळावर हा हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे.
इराणने मोर्टारने केला हल्ला
मेहर न्यूजने सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे की, इराणने सीरियाच्या पश्चिम हसाका प्रांतातील अमेरिकेच्या लष्करी तळाला लक्ष्य केले आहे. सूत्रांनी सांगितले की या हल्ल्यानंतर लष्करी तळाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. इराणने हा हल्ला मोर्टारने केला असल्याचीही माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, इराणने अद्याप या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही, मात्र इराणने इशारा दिला होता की जर अमेरिका युद्धात उडी मारली तर ते मध्य पूर्वेतील त्यांच्या लष्करी तळांना लक्ष्य करेल. त्यामुळे हा हल्ला इराणनेच केला आहे असं स्पष्ट होत आहे.
अमेरिकेने बी-2 बॉम्बरने केला होता हल्ला
अमेरिकेने इराणच्या नातानझ, इस्फहान आणि फोर्डो अणु तळांवर बी-2 बॉम्बरने हल्ला केला होता. हा हल्ला इराणच्या आण्विक स्थळावर करण्यात आला होता अशी माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. आमचा हेतू इराणने अणुबॉम्ब बनवू नये असा आहे असंही अमेरिकेने म्हटलं होतं.
19 आखाती देशांमध्ये अमेरिकेचे तळ
समोर आलेल्या माहितीनुसार 19 आखाती देशांमध्ये अमेरिकेचे तळ आहेत. अमेरिकेने सीरिया, कतारसारख्या देशांमध्ये मोठे तळ बांधलेले आहेत. मध्य पूर्वेत 50 हजार अमेरिकन सैनिक तैनात आहेत. मात्र आता इराणवर हल्ला केल्याने अमेरिकेच्या या तळांना धोका वाढला आहे. न्यू यॉर्क टाईम्सच्या मते इराणच्या निशाण्यावर तुर्की, सीरिया, कतार, सौदी, जॉर्डनचे तळ आहेत. यातील काही तळांवर इराण आणखी मोठा हल्ला करण्याची शक्यता आहे.