इंडिगो एअरलाइन्स (Indigo Airlines) ची यंत्रणा शनिवारी अचानक ठप्प झाली. त्यामुळे देशभरातील विविध विमानतळांवर प्रवासी अडकून पडले आहेत. प्रवाशांनी डीजीसीएकडे मदतीचे आवाहन केले आहे. इंडिगो एअरलाइन्सची यंत्रणा तांत्रिक कारणांमुळे अतिशय संथ गतीने काम करत आहे. विमान कंपन्यांच्या संपूर्ण नेटवर्कमध्ये ही समस्या निर्माण झाली असून, त्यामुळे विमान कंपन्यांच्या उड्डाण सेवांवर परिणाम झाला आहे. या तांत्रिक अडचणीमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून चेक इन आणि बॅगेज तपासणीसाठी विविध विमानतळांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
इंडिगोने जारी केले निवेदन –
इंडिगोने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ‘आम्ही सध्या आमच्या नेटवर्कवर तात्पुरती प्रणाली मंदावण्याच्या समस्येचा सामना करत आहोत. आमची वेबसाइट आणि बुकिंग सिस्टीमही यामुळे प्रभावित झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागत आहे. चेक-इन मंद होत असून विमानतळांवर लांबच लांब रांगा आहेत.’
इंडिगोने पुढे म्हटले आहे की, ‘आमची टीम पूर्ण समर्पणाने काम करत आहेत आणि प्रवाशांना कोणतीही समस्या येऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत. परिस्थिती लवकर सामान्य व्हावी यासाठी आमचा प्रयत्न आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.’