भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून सध्या चेन्नई येथील कारखान्यात ही ट्रेन तयार होत आहे.देशाचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवरुन व्हिडिओ शेअर करत भारतीयांना पहिल्या हायड्रोजन ट्रेनची पहिली झलक दाखवली आहे.1200 हॉर्सपॉवर क्षमतेच्या या ट्रेनचे काम सुरू असून ताशी 110 किमी वेगाने ही ट्रेन धावणार आहे. त्यामुळे, वंदे भारतनंतर मेक इन इंडियाची आणखी एक हायस्पीड ट्रेन सुरू होत आहे.
देशात हायड्रोजन इंधनावर धावणारी ही ट्रेन जींद-सोनीपत मार्गावर सुरू केली जाणार आहे. विशेष म्हणजे 2023 साली अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत हायड्रोजन ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली होती.नमो ग्रीन रेल असं या रेल्वेला नाव देण्यात आलं असून निळ्या रंगात अनोख्या ढंगात ही ट्रेन पाहायला मिळत आहे. अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ट्रेनचा तांत्रिक भाग दिसून येत आहे.
हायड्रोजन ट्रेनमध्ये एकूण 10 डब्बे असून पुढे आणि पाठिमागे इंजिन असणार आहे. ट्रेनच्या इंजिनवरच ट्रेनचे नाव लिहिण्यात आले असून नमो ग्रीन रेल असं नाव दिसून येतं.रेल्वेने या प्रकल्पानुरुप, 1600 हॉर्सपॉवरच्या दोन डबल इंजिनाचे 1200 हॉर्सपॉवरमध्ये रुपांतर करण्यात आलंय. आयसीएफ चेन्नईमध्ये हे काम पूर्णत्वास गेलं आहे.हरयाणातील जींद ते सोनीपत मार्गावर या ट्रेनचे ट्रायल घेतले जाणार असून ट्रेनमध्ये प्रवाशांच्या क्षमेतेएवढे वजन ठेऊनच ही ट्रायल होणार आहे. हायड्रोजन हे सर्वात स्वच्छ इंधन मानलं जातं.