भारतीय रेल्वेचे काही नियम आजपासून बदलत आहे. तसेच रेल्वेच्या भाड्यात वाढ होणार आहे. रेल्वेने प्रवाशांसाठी काही चांगले नियम तयार केले आहे. त्यानुसार आजपासून १ जुलैपासून ज्यांचे आयआरसीटीसी खाते आधारशी जोडलेले आहे किंवा आधारने पडताळणी झाली आहे, त्यांनाच तत्काळ तिकिटे बुक करता येणार आहे. आधार व्हेरिफिकेशन झालेले युजर आयआरसीटीसी वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवरून तिकिटे बुक करू शकतील. तसेच जुलैच्या अखेरीस ओटीपी आधारित प्रणाली लागू केली जाणार आहे.
आता आठ तास आधी चार्ट
रेल्वेचे प्रतिक्षा यादीतील तिकीट असणाऱ्यांना चांगली बातमी आहे. पूर्वी ट्रेनने प्रवास करताना प्रवासाच्या ४ तास आधी आरक्षण चार्ट अपडेट केला जात होता. त्यामुळे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही हे शेवटच्या क्षणी कळत होते. परंतु आता वेटिंग तिकिटे असलेल्यांना त्यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही हे ८ तास आधी कळणार आहे. रेल्वेचा चार्ट ८ तास आधी तयार करण्याच्या प्रस्तावाला रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. हा नवीन नियम टप्प्याटप्प्याने लागू करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. नवीन नियमानुसारच व्हीव्हीआयपी कोटातील तिकिट कन्फर्म झाले की नाही ते सुद्धा आठ तास आधी कळणार आहे.
आजपासून अशी होणार भाडेवाढ
भारतीय रेल्वेच्या प्रवासी भाड्यातही आजपासून वाढ होत आहे. ही भाडेवाढ मेल, एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांच्या विविध वर्गांमध्ये लागू होईल. जनरल तिकिटासाठी ५०० किलोमीटरपर्यंत कोणतीही भाडेवाढ नाही. वातानुकूलित आणि शयनयान श्रेणी या दोन्ही प्रकारच्या डब्यांमध्ये भाडेवाढ लागू केली जाईल. एसी चेअर कार, एसी थ्री टियर, थ्री इकॉनॉमी, एसी टू टियर, एसी फर्स्ट क्लास आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये प्रति किलोमीटर दोन पैसे भाडेवाढ केली आहे. तसेच शयनयान श्रेणीत आणि सेकंड क्लाससाठी प्रति किलोमीटर एक पैशाची भाडेवाढ करण्यात आली आहे. रेल्वेने लोकल गाड्या आणि पासधारकांना या भाडेवाढीतून वगळले आहे.
नवीन प्रणालीमुळे तिकिटांची फास्ट बुकींग
रेल्वे डिसेंबर २०२५ पर्यंत एक नवीन प्रवासी आरक्षण प्रणाली सुरू करणार आहे, ज्यामुळे तिकीट बुकिंग सध्याच्या तुलनेत ५ पट जलद होईल. सध्या एका मिनिटात ३२ हजार तिकिटे बुक केली जातात. परंतु नवीन पीआरएसमुळे १ मिनिटात १.५ लाख तिकिटे बुक केली जातील. याशिवाय एका मिनिटात ४० लाख जणांना चौकशी करता येतील. नवीन प्रवासी आरक्षण प्रणालीमुळे, वेगवेगळ्या भाषांमध्ये तिकिटे सहजपणे बुक करता येतील.