पुण्यातील सहकार नगर परिसरात एका 78 वर्षीय व्यक्तीने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडून इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या सात वर्षीय मुलीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिच्या आजीला सांगितला. त्यानंतर ही संतापजनक घटना उघडकीस आली. पीडितेच्या 61 वर्षीय आजीने सहकार नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. आरोपीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 109, 64 (1), 65 (2) आणि बाल लैंगिक अपराध प्रतिबंधक कायदा (POCSO) च्या कलम 4, 6, 8 कलमांनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मधुकर पिराजी थिटे (वय 78, रा. धनकवडी) याचा मुलगा व सून हे धनकवडी येथील एका सोसायटीत राहतात, पीडित मुलगी त्यांच्या शेजारी राहत असे. आरोपी नियमितपणे पीडितेच्या घरी ये-जा करत असे. पीडितेचे वडील रिक्षाचालक असून आईवर मानसिक आजारावर उपचार सुरू असून, पीडितेची आजी तिची काळजी घेते.
पीडित मुलगी नियमितपणे आरोपीच्या घरी खेळण्यासाठी येत होती. नेहमीप्रमाणे 06 ऑगस्ट रोजी मधुकर घरात एकटा असताना मुलगी त्याच्या घरी गेली. परिस्थितीचा फायदा घेत आरोपीने घराचा दरवाजा बंद करून तिचे कपडे काढले. तिला आपल्या बेडरूममध्ये ओढले आणि कथितरित्या तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने वेदनेने ओरडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने जबरदस्तीने तिचे तोंड दाबले. आरोपीने पीडितेच्या मानेवर धारदार चाकू ठेवला आणि ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीला धमकावून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. पीडितेला दोन ते तीन दिवस वेदना होत होत्या. वेदना असह्य झाल्याने तिने आजीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आजीने मुलींच्या वडिलांशी चर्चा करून तातडीने सहकारनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तक्रार नोंदवून आरोपीला त्याच दिवशी त्याच्या राहत्या घरातून अटक केली.