लातूरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक ,जयंत पाटील यांच्या विरोधात केली घोषणाबाजी

Spread the love

लेखणी बुलंद टीम: 

 

लातूरमध्ये आज मराठा आंदोलकांचा रौद्रावतार पहायला मिळालाय. मराठा आरक्षण आंदोलन आक्रमक स्वरूप घेतानाचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला. शिवस्वराज्य यात्रेसाठी ते लातूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान ध्वजारोहणाला आज जात असताना मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याचा जयंत पाटलांनी टाळल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजीदेखील केली.

 

धाराशिव, लातूर जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलन आक्रमकपणे आरक्षणाची भूमिका मांडताना दिसतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना घेराव घातल्यानंतर काल धाराशिव जिल्ह्यात भाजप नेते रावसाहेब दानवे यांनाही आंदोलकांनी घेरल्याचा पाहायला मिळालं. मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी राज्यात कोणतेही आंदोलन सुरू नाही असं सांगितल्यानंतरही आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना मराठा आंदोलकांनी घेरल्याचं दिसून आलं. राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता जोरदार तयारी सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केलीये. दुसरीकडे मराठा आरक्षण प्रश्न तापतानाचे चित्र आहे.

 

ध्वजारोहणाला जाताना मराठा आंदोलकांचा घेराव

आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील शिवस्वराज्य यात्रेसाठी लातूर दौऱ्यावर आहेत. आज लातूरच्या जय क्रांती महाविद्यालयात ध्वजारोहणासाठी जात असताना मराठा समाजातील आंदोलकांनी त्यांना अडवत निवेदन दिलं. मात्र मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याचं जयंत पाटलांनी टाळल्याने आंदोलन आक्रमक झाले. जयंत पाटील यांच्या विरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी तात्काळ मराठा समाज बांधवांना जयंत पाटलांपासून वेगळं केलं.

 

मराठा आरक्षणाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

लातूर जिल्ह्यात शिवस्वराज यात्रा दाखल झाल्यापासून ठिकठिकाणी मराठा समाज बांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. लातूर, निलंगा, अहमदपूर या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे यांनाही निवेदन देत राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी असं मत त्यांनी मांडलं होतं. याबाबत ठोस भूमिका राष्ट्रवादीने सांगितली नाही. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी सातत्याने मागणी मराठा समाज बांधवांकडून होत आहे. मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षण प्रश्न आपली भूमिका मांडावी ही मागणी लावून धरली होती.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *