बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात रोज नवीन माहिती उघड होत आहे. या प्रकरणात मंगळवारी मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. आरोपींनी किती क्रूर आणि अमानुषपणे संतोष देशमुख यांची हत्या केली, ते उघड होत आहे. संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींनी ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला होते, हे सीआयडीच्या चार्जशीटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांची होत असलेली हत्या अनेक लोकांनी त्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाहिली असण्याची शक्यता आहे.
मोकारपंथी ग्रुपवर व्हिडिओकॉल
आरोपींकडे मोकारपंथी नावाचाव्हॉट्सअॅप ग्रुप आहे. त्या ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला होता. कृष्णा आंधळे याने हा व्हिडिओ कॉल केला होता. संतोष देशमुख याला कशा पद्धतीने मारत आहोत, हे त्याने त्या व्हिडिओ कॉलमधून दाखवले होते. काही मिनिटे हा व्हिडिओ कॉल सुरु होता. ग्रुपवरील व्हिडिओ कॉलचा हा पुरावा मुंबई सीआयडीने चार्जशीटमध्ये दिला आहे. ग्रुपवर व्हिडिओ कॉल करणारा आरोपी कृष्णा आंधळे कुठे आहे? त्याचा शोध अजून लागला नाही. तो पोलिसांना अजून सापडला नाही.
संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींना सर्व मानवी संवेदना सोडल्या होत्या. क्रूरपणाचा कळस गाठला होता. ते व्हिडिओ कॉलमधून दिसत आहे. संतोष देशमुख यांचे कपडे काढून त्यांना विवस्त्र करुन मारहाण केली होती. त्याचे १५ व्हिडिओ आणि ८ फोटो पोलिसांना मिळाले आहे. या हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा व्हिडिओसमोर आल्यानंतर राज्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांना फाशी झाली पाहिजे, अशी घोषणाबाजी मराठा आंदोलकांनी केली. लातूरमध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी रस्त्यावर उतरत हत्या प्रकरणातील आरोपींचे फोटो जाळले आहेत. तसेच धनजंय मुंडे यांच्या विरोधातील घोषणबाजी करण्यात आली आहे.