पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता कबुतरांना (Pigeons) उघड्यावर खायला दिल्यास 5 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. शहरात अतिसंवेदनशील न्यूमोनिया (Hypersensitive Pneumonia) रोगाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) नागरिकांना आवाहन केले आहे. कबुतरांच्या पिसांमुळे फुफ्फुसाचा संसर्ग (Lung Infection) होऊ शकतो, त्यामुळे पुणे महानगरपालिकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात पीएमसीने शहरातील विविध भागात सूचना लावल्या आहेत. यामध्ये पुणे महानगरपालिकेने म्हटलं आहे की, ‘शहरात कबुतरांच्या पिंसासह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतुमुळे ‘हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया’चा आजार होत आहे. यामुळे शहरात फुफ्फुसाचा संसर्ग असलेल्यांपैकी सुमारे 65 टक्के लोकांना अतिसंवेदनशीलता न्यूमोनायटिसचे निदान झाले आहे. आम्ही नागरिकांना आवाहन करतो की कबुतरांना उघड्यावर खायला देऊ नका. तसे केल्यास त्यांच्याकडून दंड आकारण्यात येईल.’
दरम्यान, पुणे महानगरपालिकेने यासाठी शहरात जनजागृती मोहीम सुरू केली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खायला दिल्यास दंडाचा इशाराही दिला आहे. शहरात मुठा नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर धान्य टाकले जाते. या ठिकाणी कबुतरांची संख्या वाढली आहे. हिंदुस्तान टाईम्सने पीएमसी आयुक्त राजेंद्र भोसले यांचा हवाला देत वृत्त दिले आहे की, घनकचरा व्यवस्थापन विभाग शहरातील मोकळ्या जागेत कबुतरांना खायला घालणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करणार आहे.
आरोग्य तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली की, वाळलेल्या कबुतराच्या विष्ठेमुळे दमा आणि ऍलर्जी वाढू शकते. तसेच अतिसंवेदनशील न्यूमोनिया होऊ शकतो. विष्ठेतील बुरशीचे बीजाणू आणि बॅक्टेरिया या भागांची स्वच्छता करणाऱ्या व्यक्तींना आणखी हानी पोहोचवू शकतात, असंही तज्ञांनी नमूद केलं आहे.