12 जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया बोईंग 787-8 विमान दुर्घटनेत 241 निरपराध प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अत्यंत धक्कादायक घटनेमुळे देशभरातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही हवाई प्रवासाबाबत भीती आणि चिंता वाढली आहे. आधी प्रवासी फ्लाइट बुक करताना केवळ तिकीटाचे दर, वेळ आणि सुविधा यावर लक्ष केंद्रित करीत होते. मात्र आता, प्रवाशांचा कल पूर्णतः बदलला आहे आणि ते विमान प्रवासात सुरक्षेला प्राधान्य देऊ लागले आहेत.
प्रवासी सध्या चेक करतात या गोष्टी
अलीकडच्या काळात ‘काय स्वस्त?’, ‘काय वेळेवर पोहोचणार?’ हे निकष निवडताना वापरले जात होते, पण एअर इंडिया अपघातानंतर चित्र बदलले. लोकलसर्कल्स या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार सुमारे 41% भारतीय प्रवासी आता फ्लाइट बुक करताना विमान कोणत्या एअरक्राफ्टवर चालते हे पाहतात. एवढेच नाही, तर 14% लोक विमानाच्या सुरक्षा मानकांबाबत माहिती शोधतात. या सर्वेक्षणात देशातील 294 जिल्ह्यांतील 60,000 प्रवाशांनी भाग घेतला होता.
फ्लाइट अपघातानंतर वाढली तांत्रिक बिघाडांची प्रकरणं
एअर इंडिया अपघातानंतर पाच दिवसांतच बोईंग 787-8 वरून नियोजित 66 फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या. यामागे विविध तांत्रिक बिघाडांचे अहवाल होते. केवळ एअर इंडिया नव्हे तर ब्रिटिश एअरवेज आणि अन्य आंतरराष्ट्रीय फ्लाइट्समध्येही तांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या मनात विश्वासाची मोठी घसरण झाली आहे.
प्रवाशांचं बदललेलं वर्तन
पूर्वी प्रवासी केवळ एअरलाइनच्या ब्रँडवर किंवा ऑफरवर फ्लाइट बुक करत होते, आता ते यापेक्षा अधिक माहिती गोळा करत आहेत. फ्लाइट बुक करताना प्रवासी विमानाचा प्रकार, पायलटचा अनुभव, मेंटेनन्स रेकॉर्ड आणि भूतकाळातील अपघातांची माहिती पाहतात. काही प्रवासी तर स्वतः संशोधन करून सुरक्षा आकडेवारी तपासत आहेत.
सरकार आणि एअरलाइन कंपन्यांसमोर मोठं आव्हान
या अपघातानंतर एअरलाइन उद्योगासमोर प्रवाशांचा गमावलेला विश्वास परत मिळवण्याचं मोठं आव्हान आहे. नियमित तपासणी, प्रशिक्षित कर्मचारी, पारदर्शक माहिती देणं, तसेच सुरक्षा प्रोटोकॉल्सचे काटेकोर पालन करणं ही आता फक्त औपचारिकता नसून आवश्यक गरज झाली आहे. सरकारलाही DGCA मार्फत कडक नियमन आणि ऑडिटसाठी पुढे यावं लागणार आहे.
हवाई प्रवास हे जितकं वेगवान आणि आरामदायक माध्यम आहे, तितकंच ते सुरक्षेच्या दृष्टीने जबाबदारीचं देखील असतं. आणि याच भानाने आता प्रवाशांची मानसिकता बदलत चालली आहे.
.