काही महिन्यांपूर्वी पुण्यात भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी त्यांची पत्नी आणि तिचा प्रियकर यांना अटक करण्यात आली होती. याच घटनेची पुनरावृत्ती पुण्यातील लोणी काळभोर परिसरातून समोर आली आहे. अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्याने पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा डोक्यात फावडा घालून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रवींद्र काशिनाथ काळभोर असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी अवघ्या तीन तासात पत्नी शोभा रविंद्र काळभोर आणि तिचा प्रियकर गोरख त्र्यंबक काळभोर यांना अटक केली आहे. मंगळवारी सकाळी रवींद्र काळभोर हे घराच्या बाहेरील पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडून आल्याचे दिसून आले. पत्नीची चौकशी केली असता रवींद्र हे अनैतिक संबंधात अडसर होत असल्याने रवींद्र काळभोर यांचा कायमचा काटा काढला.
नेमकं प्रकरण काय?
पुणे शहरातील लोणी काळभोर परिसरातील वडाळे वस्ती परिसरात राहणारे रवींद्र काळभोर हे सोमवारी रात्री 11च्या सुमारास नेहमीप्रमाणे घराबाहेर पलंगावर झोपले होते. मात्र पहाटेच्या सुमारास त्यांच्या डोक्यात दगडाने आणि लाकडी दांडक्याने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. सकाळी रवींद्र हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणाची माहिती घेत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासाला सुरुवात झाली. यानंतर अवघ्या तीन तासात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांनी याप्रकरणी रवींद्र यांची पत्नी शोभा रवींद्र काळभोर (42) आणि गोरख त्रंबक काळभोर (41) यांना अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहितीही समोर आली.
रवींद्र काळभोर यांच्या हत्येनंतर पोलिसांनी आजूबाजूला, तसेच शेजाऱ्यांकडे याबद्दलची चौकशी केली. यावेळी पोलिसांना रवींद्र यांची पत्नी शोभा आणि गोरख यांच्यात अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. यामुळे पोलिसांच्या संशयाची सुई त्या दोघांकडे वळली. यानंतर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. यावेळी सुरुवातीला त्या दोघांनीही व्यवस्थित उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही गुन्हा कबूल केला.
शोभा आणि गोरख यांच्यातील अनैतिक संबंधांना रवींद्र यांचा अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे या दोघांनी मिळून त्याचा काटा काढण्याचा कट रचला. यानंतर सोमवारी रात्री त्यांच्यावर हल्ला करत रवींद्र यांना संपवलं. यानंतरही शोभा आणि गोरख दोघेही काहीच घडले नाही, असे वागत होते. मात्र पोलिसांनी अवघ्या तीन तासांत या गुन्ह्याचा तपास केला.