नागपुरातील राड्यात तीन पोलीस आयुक्तांसह शेकडो पोलीस कर्मचारी जखमी

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या (Chhatrapati Sambhajinagar) औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनाला नागपूरमध्ये हिंसक वळण लागले आहे. सोमवारी संध्याकाळी नागपूरमध्ये (Nagpur News) दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याने हिंसाचार उफाळला. यामध्ये अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. नागपूरच्या महल परिसरापासून काही अंतरावर असणाऱ्या चिटणीस पार्क परिसरातही याची झळ पोहोचली. ‘एबीपी माझा’ने येथील नागरिकांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी भयावह अनुभव सांगितला.

तर दुसरीकडे, जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या कर्तव्य पथावरील पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकातील अनेकांनाही जबर मार बसला आहे. यात प्रामुख्याने तीन पोलीस आयुक्तांसह शेकडो पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. नागपूर पोलिसांचे तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी यात गंभीर जखमी झाले असून त्याचावर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

तीन पोलीस आयुक्तांसह शेकडो जण जखमी
पुढे आलेल्या माहितीनुसार, निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीचा वार झाल्यामुळे ते काल रात्री रक्तबंबाळ झाले होते. त्यात ते गंभीर जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल झालेत. तर जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीच्या घटनेत डीसीपी शशिकांत सातव यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे तेही रुग्णालयात दाखल झाले आहेत. तर डीसीपी अर्चित चांडक यांना गंभीर लिगामेंटल इंज्यूरी झाली होती. त्यानाही रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. तर डीसीपी राहुल मदने यांनाही दगडाचा वार बसला होता. मात्र ते सध्या कर्तव्यावर हजर असल्याची माहिती पुढे आली आहे.

संचारबंदी लागू , शाळा आणि महाविद्यालय बंद
नागपुरातील चिटणीस पार्क, भालदारपुरा, महाल, शिवाजी चौक, हंसापुरी या भागात काल रात्री अशांतता निर्माण होऊन प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ झाली असली तरी परिसरातील काही बँक आज नियमित वेळेवर उघडण्यात आल्या आहे. महाल परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा कर्मचाऱ्यांनी नियमित वेळेवर येऊन उघडली आहे. आम्हाला आज बँक उघडी ठेवण्याच्या सूचना असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव दक्षता म्हणून परिसरातील शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत. बाजारपेठा संचारबंदी लागू असल्यामुळे पूर्णपणे बंद आहेत. आता हळूहळू पोलिसांनी वेगवेगळे रस्तेही बंद करायला सुरुवात केली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *