अमेरिकेतील टेक्सास (Texas) राज्यातील ह्युस्टनमधील सेल्युलर टॉवर (Cellular Tower) वर रविवारी 20 ऑक्टोबर रोजी हेलिकॉप्टर कोसळल्याची (Helicopter Crash) धक्कादायक घटना घडली. या अपघातात एका लहान मुलासह चार प्रवाशांचा मृत्यू झाला. ह्युस्टन अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार ही घटना एंजेल्के आणि एनिसच्या व्यस्त रस्त्यावर सायंकाळी 7:54 च्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, खासगी हेलिकॉप्टर R44 शहराच्या सेकंड वॉर्डमध्ये एन्गेलके स्ट्रीट आणि नॉर्थ एनिस स्ट्रीट चौकात एका रेडिओ टॉवरला धडकले. एलिंग्टन फील्डवरून उड्डाण केलेले हेलिकॉप्टर कम्युनिकेशन टॉवरला धडकले, ज्यामुळे खाली कोसळले. या घटनेत हेलिकॉप्टर आणि टॉवर दोन्ही पूर्णपणे नष्ट झाले.
ह्यूस्टन अग्निशमन विभाग अपघाताच्या तपासात मदत करण्यासाठी ड्रोनचा वापर करत आहे. प्रेस ब्रीफिंगमध्ये, अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले की, हेलिकॉप्टर खाली कोसळल्याने आग तीन ब्लॉकपर्यंत पसरली. या प्रकरणी नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड आणि फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन चौकशी करतील असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.