पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात बुधवारी सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, सकाळी पावणेसात वाजता हा अपघात (Helicopter Crash) झाल्याचे समजते. अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक आणि एक इंजिनीअर होता. हेलिकॉप्टरणने उड्डाण केल्यानंतर ते मुंबईतील जुहूच्या दिशेने निघाले होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर काहीवेळातच हेलिकॉप्टर दरीत कोसळले. हा अपघात नेमका कसा घडला, याची नेमकी माहिती समोर आलेली नाही. हा परिसर पुणे-बंगळुरु महामार्गापासून काही अंतरावर आहे.
याठिकाणी एका टेकडीवर ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट आहे. येथील हेलिपॅडवरुन आज सकाळी या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. मात्र, हा भाग डोंगराळ असल्याने येथे धुके होते. त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचे सांगितले जाते. अपघात झाल्यानंतर हेलिकॉप्टरने लगेच पेट घेतला आणि त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. बावधन बुद्रुकमधील ऑक्सफर्ड काऊंटी आणि एच.ई.एम.आर. एल. संस्था यामध्ये जो निर्मनुष्य परिसर आहे, तेथील दरीत हे हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगितले जाते.
हिंजवडी पोलीसांच्या कंट्रोल रुमला या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, पोलीस आणि इतर यंत्रणा बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचल्या. मात्र, या भीषण अपघातामध्ये वैमानिकासह हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या अन्य दोघांचाही मृत्यू झाला. मात्र, येथील रिसॉर्टमध्ये अनेक उच्चभ्रू व्यक्ती पर्यटनासाठी येत असतात. त्यांना पुण्यातून थेट रिसॉर्टमध्ये येण्यासाठी हेलिपॅड उभारण्यात आले आहे. हे रिसॉर्ट मुळशीपासून काही अंतरावर आहे. पुणे-बंगळुरु महामार्गही येथून काही अंतरावरच आहे. काही दिवसांपूर्वी मुळशी भागातही एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. मात्र, त्यावेळी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
अलिशान रिसॉर्टमध्ये उच्चभ्रू व्यक्तींचा वावर
मुळशीचा हा सगळा परिसर डोंगराळ आहे. पुण्यातील पावसाचा जोर ओसरला असला तरी डोंगराळ भागात मोठ्याप्रमाणावर धुके आहे. याच धुक्यामुळे हेलिकॉप्टरच्या वैमानिकाचा अंदाज चुकला असावा आणि हेलिकॉप्टर कोसळले असावे, असा अंदाज वर्तवविला जात आहे. हा भाग पुण्यापासून काही अंतरावरच आहे. हा परिसर नैसर्गिक सौदर्यांने नटलेला असल्यामुळे या परिसरात अनेक रिसॉर्टस आहेत. यापैकी ऑक्सफर्ड काउंटी हे अलिशान रिसॉर्ट हे प्रसिद्ध आहे. याठिकाणी अनेक सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध व्यक्ती येत असतात. या व्यक्तींना पुण्यातून थेट रिसॉर्टमध्ये आणण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जातो, अशी माहिती स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांनी दिली. काही दिवसांपूर्वीही या भागात आणखी एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. मी आता घटनास्थळी पाहणी करण्यासाठी जाणार असल्याची माहिती संग्राम थोपटे यांनी दिली.