माध्यमांमधून वाचायला-ऐकायला-पाहायला मिळणारं राजकारण म्हणजे हिमनगाचं टोक असतं, असं नेहमीच बोलून दाखवलं जातं. त्यात तथ्य आहेच. खऱ्या राजकारणातील डाव-प्रतिडाव, शह-मात, प्याद्यांचे बळी आपल्यासारख्या सामान्यांपर्यंत सहसा येत नाहीत. तुम्ही अगदी आतल्या वर्तुळातले, गोटातले असाल किंवा हल्लीच्या माध्यमांच्या लोकप्रिय भाषेत बोलायचं तर तुम्हीच ‘खातरीशीर सूत्र’ असाल, तर हे पाहण्या-अनुभवण्याची संधी मिळते.
रोज घडणाऱ्या राजकारणात तिरक्या, अडीच घरांच्या चाली असतात, तशा अनेक गमतीजमतीही घडत असतात. पडद्याआड होणाऱ्या आणि आपल्यापर्यंत येताना मीठ-मसाला लेवून किंवा पाणी टाकून येणाऱ्या अनेक गमती.
राजकारण करणाऱ्या मंडळींचा असाच एक धमाल किस्सा अलीकडे ऐकायला मिळाला. सामान्य मध्यमवर्गीय नोकरदार कुटुंबात वाढलेला एक मुलगा सामाजिक जीवनात सहभागी होतो आणि एकाहून अधिक वेळा आमदार म्हणून निवडून येतो. सत्तेच्या अगदी आतल्या वर्तुळापर्यंत पोहोचतो. हे कसं साध्य होतं?
खरं तर नेत्यानं निवडणुकीसाठी अर्ज आधीच भरलेला होता. त्याच अर्जाला ‘ए-बी फॉर्म’ जोडायचं काम बाकी. शेवटच्या दिवशीची जल्लोषातली मिरवणूक फक्त कार्यकर्त्यांमध्ये जोष आणण्यासाठी. हवा तयार करण्यासाठी. आपली ताकद दाखविण्यासाठी – आपल्या कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आणि विरोधकांना धडकी भरवण्यासाठी.
जिल्हा मुख्यालयावरून ही जोडगोळी मतदारसंघात परतली, तेव्हा मिरवणूक पूर्ण भरात आलेली. फटाक्यांची आतषबाजी आणि गगनभेदी घोषणा. कार्यकर्त्यांचा उत्साह टिपेला गेलेला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं कार्यालय अगदी जवळच आलं होतं.