गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमधील मेट्रो 3 चा पहिला टप्पा (Metro 3 Phase 1) कधी सुरु होणार याबाबत चर्चा आहे. आता याबाबत एक महत्वाचे अपडेट समोर आले आहे. आरे ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) ला जोडणारा मेट्रो 3 चा पहिला टप्पा सप्टेंबरच्या अखेरीस कार्यान्वित होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केली. या मेट्रो सेवेचे आरे-बीकेसी-आरे दरम्यान ऑपरेशन केले जाईल. या लाईनच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पुढील वर्षभरात पूर्ण होणे अपेक्षित आहे.
मेट्रो लाइन 3 च्या पहिल्या टप्प्यात दहा स्थानकांचा समावेश आहे. एक्वा लाइन अंधेरी उपनगरातून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) पर्यंत प्रवास करते आणि शेवटी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) पर्यंत पोहोचते.
मेट्रो लाइन 3 ही 33.5 किलोमीटर पसरलेली असून, संपूर्ण मुंबईतील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी डिझाइन केलेला एक एक महत्त्वाचा उत्तर-दक्षिण कॉरिडॉर आहे. ही लाईन सहा व्यावसायिक उपनगरे, 30 कार्यालयीन क्षेत्रे, 12 शैक्षणिक संस्था, 11 प्रमुख रुग्णालये, 10 वाहतूक केंद्रे आणि मुंबईतील दोन्ही विमानतळांना जोडेल. या विस्तृत नेटवर्कचा उद्देश संपूर्ण शहरात प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करण्याचा आहे.
दरम्यान, हा भूमिगत कॉरिडॉर आहे. कॉरिडॉरवर 27 स्थानके असून, त्यातील 26 भूमिगत आणि एक जमिनीवर आहे. पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी, दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते वरळी आणि तिसऱ्या टप्प्यात वरळी ते कुलाबा दरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे.
मेट्रो 3 वरील स्थानके:
फेज 1- वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC), विद्यानगरी, सांताक्रूझ, देशांतर्गत विमानतळ टर्मिनल 1, सहार रोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2, मरोळ नाका, एमआयडीसी, सिप्झ आणि आरे कॉलनी.