सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पिलीव कालव्याची दुरुस्ती..

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

सोलापूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी खुशखबर मिळाली आहे. काही दिवसापूर्वी फुटलेल्या ब्रिटिशकालीन 100 वर्षांपूर्वीच्या पिलीव कालव्याची दुरुस्ती केवळ 12 दिवसात पूर्ण करण्यात आली आहे. उन्हाळ्यात हा कालवा फुटल्यामुळं हजारो शेतकरी चिंतेत होते. मात्र, प्रशासनाने युद्ध पातळीवर हे काम हाती घेत केवळ 12 दिवसात या कालव्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे. आजपासून या कालव्यातून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात येऊ लागल्याने हजारो हेक्टरवरील पिकांना याचा फायदा होणार आहे.

कालवा फुटल्यानंतर शेतकरी अडचणीत आले होते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे 6 मे रोजी नीरा उजवा कालवा फुटून ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. वास्तविक निरा योजनेतील कालवे जलसेतू याची बांधकामे जवळपास 100 वर्षांपूर्वीची म्हणजे 1925 सालामधील असून आता याचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे आहे. हा कालवा फुटल्यानंतर शेतकरी अडचणीत आले होते. मात्र प्रशासनाने युद्ध पातळीवर विक्रमी वेळेत याची दुरुस्ती आता पूर्ण केल्याने या कालव्यातून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. नीरा उजवा कालव्याची पाणी पाळी सुरु झाल्यानंतर सहा मे रोजी या जलसेतूच्या भिंतीला मोठे भगदाड पडले आणि पंढरपूर सांगोला माळशिरस या तीन तालुक्यातील हजारो हेक्टर वरील शेतकऱ्यांची पिके अडचणीत आली होती. यानंतर प्रशासनाने तातडीने दुरुस्ती सुरू करून या जलसेतूच्या भिंतीवर आधी दगडाचे सोलिंग करून त्यानंतर अद्ययावत तंत्रज्ञानाने येथे काँक्रीट केले. आता या कालव्यातून आजपासून पुन्हा पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुढील 70 ते 80 वर्ष ही योजना पूर्ण क्षमतेने चालू शकणार
ब्रिटिश कालीन या योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी याचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे लागणार आहे. या पद्धतीनं काम झाल्यास पुढील 70 ते 80 वर्ष ही योजना पूर्ण क्षमतेने चालू शकणार असल्याची माहिती नीरा कालवा विभागाचे उपविभागीय अभियंता आनंद पासलकर यांनी दिली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *