“एकूणच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण गढूळ झालं आहे. चिखल झाला आहे. आजपर्यंत असं वातावरण महाराष्ट्रात कधी पाहिलं नव्हतं. तुम्ही निवडणुकीत या लोकांना मतदान करायचं, नंतर हे लोक विकली जातात. सध्या कोण कुठल्या पक्षात आहे, ते समजतच नाही. तुम्हाला याचा राग येतो की नाही? विधानसभा निवडणूक ही तो राग व्यक्त करण्याची जागा आहे” असं राज ठाकरे म्हणाले.
‘तसा गुन्हेगाराचा चौरंग करा’
“बदलापूरमध्ये मुलीवर शारीरिक अत्याचार झाला. बलात्काराचा प्रयत्न झाला. मनसेच्या महिला आघाडीने ती गोष्ट बाहेर काढली, तो पर्यंत ती गोष्ट दाबून ठेवली होती. लहान मुलींवर बलात्कार सुरु आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चौरंगाची शिक्षा होती, तसा गुन्हेगाराचा चौरंग केला पाहिजे” असं राज ठाकरे म्हणाले.
‘पुन्हा कुठल्या बाईकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत होणार नाही’
“कायद्याचा वचक नाही. मी पोलीस यंत्रणेला अजिबात दोष देणार नाही. त्यांच्यावरचा सरकारी दबाव त्यामुळे त्यांना तसं वागाव लागतं. पोलिसांनी काही गोष्टी करायला घेतल्या की त्यांचं निलंबन करणार. चौकशी लावणार. मी हे गांभीर्यपूर्वक सांगतोय, एकदा हा महाराष्ट्र राज ठाकरेच्या हातात देऊन बघा, कायद्याची भिती काय असते ते दाखवून देईन. पुन्हा कुठल्या बाईकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत होणार नाही. फक्त 48 तास दिले, तर मुंबई पोलीस साफ करुन ठेवतील” असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला. यवतमाळ वणीमध्ये राज ठाकरे यांनी राजू उंबरकर यांची उमेदवारी यावेळी जाहीर केली.