गझलकार भीमराम पांचाळे यांना लता मंगेशकर पुरस्कार (2025) प्रदान करण्यात आलाय. वरळीतील एनएससीआय डोममध्ये हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह 60 आणि 61 वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज महावारसा या नवीन पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, गझलकार भीमराव पांचाळे यांच्या गझलांनी गेली 50 वर्ष सर्वांवर मोहिनी घातली आहे. अमरावती जिल्ह्याने आपल्याला दोन हिरे दिले आहेत. एक भीमराव पांचाळे आणि दुसरे म्हणजे सुरेश भट… या जोडीने गझलांना वेगळी उंची दिली. मराठीतील गझलांमध्ये भीमराव पांचाळे आणि सुरेश भट यांचा कोई मुकाबला नही.. कित्येक देशांमध्ये त्यांनी गझला नेल्या. वर्ध्याच्या स्मशानातही त्यांनी कार्यक्रम केला. त्यांचा आपण गौरव करु शकलो, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भीमराव पांचाळे यांचं कौतुक केलं.
कोणाला कोणता पुरस्कार? संपूर्ण यादी
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार – भीमराव पांचाळे
चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार (2024) – प्रसिध्द दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर
चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार – अभिनेत्री मुक्ता बर्वे
स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार (2024) – ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर
स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार – अभिनेत्री काजोल
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, काजोल यांनी 30 वर्षांपूर्वी हिंदी चित्रपटामध्ये कारकीर्द सुरु केली. त्यानंतर सातत्याने त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांना भूरळ पाडली. आजही समर्थपणे त्या सिनेमामध्ये भूमिका पार पाडत आहेत. आज त्यांचा जन्मदिवस देखील होता. त्यांच्या वाढदिवसा दिवशी हा पुरस्कार देताना विशेष आनंद वाटतो. तनुजाजी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या याचा आनंद आहे. त्या उत्तम कलावंत तर आहेतच आणि सोबतच त्याकाळात एका मराठी मुलीने त्या काळात सिनेक्षेत्रात साम्राज्य प्रस्थापित केलं. त्यामुळे त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो.
अनुमप खेर यांना आपण पुरस्कार दिला. त्याच्याबद्दल काही सांगण्याची गरज नाही. अतिशय सुंदरपणे ते भूमिका साकारत असतात. हास्यकलाकाराची भूमिका असेल किंवा संवेदनशील भूमिका असेल त्यांनी सर्व प्रकारच्या भूमिका सुंदरपणे साकारल्या आहेत. पण आज त्यांनी माझा एक डायलॉग चोरलेला आहे. ते म्हणाले मी पुन्हा येईन… याचा कॉपीराईट माझ्याकडे आहे. तो कॉपीराईट मी त्यांना द्यायला तयार आहे. मला विश्वास आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते पुन्हा या मंचावर दिसतील.
मुक्ता बर्वे अतिशय गुणी अभिनेत्री आहे. नाटक आणि सिनेमातून तिने 360 डिग्री प्रमाणे त्यांनी काम केलं. विशेषत: त्यांचा चारचौघींमधील मोनोलॉग अप्रतिम आहे. त्यांचाही आपल्याला सत्कार करण्यात आला. महेश मांजरेकर सरांचा ‘आवाजही काफी है..’.. ते त्यांच्या आवाजाने घायाळ करु शकतात. उत्तम कलावंत आणि दिग्दर्शक आहेत. त्यांनी आपल्याला अप्रतिम सिनेमे दिले. त्यांचा गौरव करण्याची संधी मिळाली, यासाठी आम्ही स्वत:ला धन्य समजतो.
मला मराठी चित्रपटात काम करायला खूप आवडेल – काजोल
यावेळी अभिनेत्री काजोलला हिंदीतून प्रतिक्रिया विचारली तेव्हा तिने स्पष्टपणे नकार दिला. “आता मी पुन्हा हिंदीतून बोलेन? ज्यांना समजायचे ते समजतील” असे कालोजने म्हटले. पुढे बोलताना काजोल म्हणाली, माझ्या आईला हा पुरस्कार मिळाला होता, त्यामुळे मला हा पुरस्कार मिळणे जास्त अभिमानाचे आहे. मला मराठी चित्रपटात काम करायला खूप आवडेल, चांगली स्क्रिप्ट मिळाली तर मी नक्की काम करेन, असे काजोल म्हणाली.