वंचितचे पहिल्यांदाच तब्बल १९९ उमेदवार विधानसभेच्या रिंगणात; ‘ओबीसी-बौद्ध-मुस्लीम’ असे नवे समीकरण

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

वंचित बहुजन आघाडी ही आलुत्या-बलुत्यांची असल्याची ग्वाही देणारे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच सर्वाधिक म्हणजे तब्बल ९४ उमेदवार (४८ टक्के) केवळ बौद्ध दिले आहेत. बौद्धांनंतर मुस्लीम आणि इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) उमेदवारी देऊन ‘बौद्ध-मुस्लीम-ओबीसी’ असे नवे समीकरण या वेळी अॅड. आंबेडकर यांनी राज्यात उभे केले आहे.

वंचित बहुजन आघाडीने २१३ उमेदवारांना पक्षाचे ‘ए-बी’ अर्ज दिले होते. काही उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असून काहींनी उमेदवारी माघारी घेतली आहे. प्रत्यक्षात ‘वंचित’चे १९९ उमेदवार विधानसभेच्या रिंगणात आहेत. त्यापैकी ९४ उमेदवार बौद्ध, २३ उमेदवार मुस्लीम, १७ उमेदवार इतर मागासवर्गीय आणि १५ उमेदवार भटके विमुक्त गटातील आहेत.

‘भटके विमुक्तां’मध्ये उमेदवार देताना ‘वंचित’ने धनगर उमेदवारांना प्राधान्य दिले आहे. ‘वंचित’ने ५ मराठा उमेदवार दिले असून चर्मकार १ आणि मातंग ४ उमेदवार दिले आहेत. जैन, फकीर, अंध उमेदवार देणाऱ्या वंचित आघाडीने या वेळी एकही ब्राह्मण उमेदवार दिलेला नाही. ‘वंचित’ने या वेळी तृतीयपंथीयांना उमेदवारी दिली आहे.

बौद्धांनंतर ‘वंचित’ने मुस्लीम धर्मीयांना उमेदवारी देण्यात प्राधान्य दिले आहे. ‘वंचित’ने दुसरी उमेदवार यादी केवळ मुस्लीम उमेदवारांची जाहीर केली होती. ‘वंचित’च्या १९९ उमेदवारांमध्ये बाळापूरचे नतीबुद्दीन खतीब आणि गंगाखेड मतदारसंघात सीताराम घनदाट हे दोन माजी आमदार आहेत.

‘वंचित’ने १४ महिला उमेदवार दिले आहेत. हा असा एकमेव पक्ष आहे, ज्याने आपले उमेदवार जाहीर करताना त्यांची जात दिली आहे. २०१९ पासून ‘वंचित’च्या मतांच्या टक्केवारीत घसरण होत आहे. ८ टक्के मते घेणारा हा पक्ष नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या ३ टक्के मतांवर आला आहे. त्यामुळे ‘वंचित’ने या वेळी बौद्ध समाजाला उमेदवारीत प्राधान्य दिले आहे.

आमच्या पक्षाचा पाया बौद्ध आहेत. या वेळी आम्ही पक्षातील कार्यकर्त्यांना अधिक उमेदवारी देण्याचे सूत्र ठेवले होते. त्यामुळे बौद्ध उमेदवार संख्येने अधिक आहेत.- रेखा ठाकूर, प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *