महाराष्ट्रात मान्सून १२ दिवस आधी दाखल झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मंगळवारीही राज्यात अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस होणार आहे. मुंबईत पहाटेपासून पाऊस सुरु झाला आहे. मुंबईत हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. राज्यात आतापर्यंत पावसाचे चार बळी गेले आहे. पुणे जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला आहे तर विरारमध्ये एक जण दगावला आहे.
कुठे कोणता अलर्ट
रेड अलर्ट: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांसह सातारा घाटमाथा घाटमाथ्यावर मुसळधारे पावसाचा रेड अलर्ट
ऑरेंज अलर्ट: रायगड, पुणे जिल्ह्यांचा घाटमाथा, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
येलो अलर्ट: ठाणे, मुंबई, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा. तसेच उर्वरित राज्यात येलो अलर्ट दिला आहे.
मुंबईत रिमझिम पाऊस
मुंबईत सोमवारी पावसामुळे बिकट परिस्थिती झाली होती. रेल्वे सेवेवर पावसाचा परिणाम झाला होता. भुयारी मेट्रो स्थानकात पाणी गेले होते. मंगळवारी मुंबईत रिमझिम पाऊस सुरु आहे. हिंदमाता, किंग सर्कल, दादर, अंधेरी, वांद्रे भागात रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. सध्या तरी कुठेही पाणी साचलेले नाही. हवामान विभागाने आजही पावसाचा अंदाज वर्तवलेला असल्याने नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचे तीन बळी
पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचे तीन बळी गेले आहे. कर्वेनगर भागात झाड कोसळून एक दुचाकीस्वार ठार तर खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात मासेमारी करणाऱ्या तरुणाचा वीज कोसळून मृत्यू झाला. दौंड शहरात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पुण्यात मुसळधार पावसामुळे राज्य आपत्ती विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नाशिक जिल्ह्यातील काही भागांत पाऊस झाला. येवला शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे दिवसभर उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. परंतु पावसाने शेतात साठवलेला कांदा भिजल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.