अहमदाबाद विमान दुर्घटनेत (Ahmedbad plane crash) एअर इंडियाच्या 171 विमानाचे कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यासह 241 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गेल्या 4 दिवसांपासून या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना एनडीएन सॅम्पलची चाचणी केल्यानंतर त्यांचे मृतदेह सोपविण्यात येत आहे. सुमित सभरवाल यांचे पार्थिव आज त्यांच्या मुंबईतील (Mumbai) घरी आल्यानंतर सोसायटीतील रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती. दिवंगत कॅप्टन सुमित यांना अखेरचा निरोप देताना, त्यांच्या वडिलांकडे पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
देवा, कोणत्याही पालकावर अशी वेळ कधीच येऊ नये, असा हा भावूक क्षण होता. एअर इंडियाच्या AI-171 विमानाचे कॅप्टन सुमित सभरवाल यांचे 88 वर्षांचे वृद्ध वडील आपल्या लेकाचे पार्थिव पाहून गहिरवले. काठी टेकत टेकत मुलाच्या पार्थिवावर पोहोचल्यानंतर, पार्थिव शरीरावर ठेवण्यात आलेला लेकाचा रुबाबदार गणवेशातील हसरा फोटो पाहून डोळ्याच्या कडा पाणावल्या. पुष्कराज यांनी शवपेटीवर अश्रू ढाळतच हातातील काठी बाजूला सरकवत दोन हात जोडून लेकाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
सुमित सभरावाल यांचे पार्थिव आज पवईतील त्यांच्या घरी आणल्यानंतर स्थानिकांसह, नातेवाईकांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर, चकाला येथील विद्युत दाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार दिलीप लांडे, उद्योगपती निरंजन हिरानंदाणी यांच्यासह सोसायटीतील स्थानिक व नातेवाईकांनी अंत्यसंस्काराला गर्दी केली होती. मात्र, या गर्दीत एक चेहरा अनेकांच्या डोळ्यात पाणी आणण होता, तो म्हणजे सुमित यांचे वडिल पुष्कराज सभरवाल यांचा. आपल्या लेकाच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार घेताना चेहऱ्यावरील शांत भावही मनातील आक्रोश सांगून जात होते.
विमान दुर्घटनेत 275 जणांचा मृत्यू
12 जून रोजी अहमदाबाद येथून लंडनसाठी उड्डाण करणारे एअर इंडियाचे 171 विमान कोसळले. अवघ्या काही मिनिटांत हे विमान खाली कोसळले, या दुर्दैवी घटनेत जवळपास 275 नागरिकांचा मृत्यू झाला असून विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी सरकारने विविध एजन्सींमार्फत तपास सुरू केला आहे. मात्र, या घटनेनं कित्येक कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला, अनेकांनी आपले आई-वडिल, मुलगा, सुन, नातवंडे अशी घरातली माणसं गमावली. या अपघाताने खोलवर जखमा केल्या असून कधीही भरुन न येणारं दु:ख नातेवाईकांच्या सोबतील आलं आहे.