मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात (accident) झाल्याची घटन घडलीय. यामध्ये दोन एसटी बसेस समोरासमोर धडकून 25 प्रवाशी जखमी झाले आहेत. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणे जवळ हा अपघात घडला आहे.
मुंबईकर चाकरमान्यावर वाहतूक कोंडीसह हे अपघाताचे विघ्न आले आहे. मुंबईवरुन राजापूरकडे जाणाऱ्या बसला मुंबईकडे जाणाऱ्या बसने जोरदार धडक दिली. बसेस एकेमकांवर आदळल्याने नागोठणे परीसरात पुन्हा वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
सालाबादप्रमाणे यंदाही महामार्गावर वाहतूक कोडींचे विघ्न
आजपासून राज्यात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबईहून कोकणात जात आहेत. यंदा कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास यंदा सुखकर होईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. सालाबादप्रमाणे यंदाही महामार्गावर वाहतूक कोडींचे विघ्न प्रवाशांना अनुभवायला मिळाले. आता तर महामार्गाचे काम पूर्ण होण्यास दोन वर्षे लागतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनीच कबूल केल्यामुळे दोन वर्षे तरी हे विघ्न सहन करावे लागणार आहे. दरवर्षीच महामार्गावर कोंडीची समस्या होते.
सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
रात्री गणेशभक्त कोकणच्या दिशेने निघाले. मुंबईतून दीड हजाराहून अधिक एसटीच्या बसेस कोकणच्या दिशेने सोडण्यात आल्या होत्या. या शिवाय खाजगी वाहनेही हजारोच्या संख्येने तळ कोकणात जाण्यासाठी बाहेर पडली. यामुळे महामार्गावरील वाहनांची संख्या अचानक वाढली आहे. त्यामुळं महामार्गावर कोंडी निर्माण झाली आहे. दोन्ही मार्गिकांवर कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळं वाहतूक ठप्प झाली आहे. सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.