प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाहच्या मालकीच्या चंदीगडमधील बारमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. चंदीगडमधील सेक्टर 26 मध्ये बादशाहच्या मालकीचा बार आहे. बाईकवरून आलेल्या दोन संशयितांनी या खासगी क्लबच्या दिशेने कमी तीव्रतेची स्फोटकं फेकली. पहाटे 2.30 ते 2.45 वाजेदरम्यान हा स्फोट झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीची जीवितहानी झाली नाही. मात्र स्फोटामुळे क्लबच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. त्यामुळे मालमत्तेचं बरंच नुकसान झालं आहे. स्फोटाबद्दलची माहिती मिळताच चंदीगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
बॉम्ब शोधक पथक आणि चंदीगड फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे पथकसुद्धा नमुने गोळा करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. ‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, आरोपींनी खंडणीच्या उद्देशाने हा कमी तीव्रतेचा स्फोट घडवून धमकी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी आणि स्फोटामागील उद्देश जाणून घेण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत.
बादशाहचा क्लब ज्या परिसरात आहे, तिथे भाजी मार्केट आणि शाळा असल्याने सतत लोकांची वर्दळ असते. धमकावण्याच्या उद्देशाने कमी तीव्रतेची स्फोटकं वापरण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी सध्या या परिसरातील सुरक्षा वाढवली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कोण आहे बादशाह?
गायक आणि रॅपर बादशाहचं मूळ नाव आदित्य प्रतीक सिंह असं आहे. तो रॅपर, गायक, गीतकार, संगीत निर्माता आणि व्यावसायिकसुद्धा आहे. त्याने हिंदी, इंग्रजी, पंजाबी आणि हरयाणवी भाषेत अनेक गाणी गायली आहेत. हिप-हॉप आणि रॅप म्युझिकमुळे तो तरुणाईमध्ये अधिक लोकप्रिय आहे. ‘कर गई चुल’, ‘गरमी’, ‘नैना’, ‘प्रॉपर पटोला’ अशी अनेक हिट गाणी त्याने गायली आहेत. पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतही बादशाहचं खूप मोठं नाव आहे. बादशाह त्याच्या खासगी आयुष्यामुळेही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत त्याचं नाव जोडलं जातंय.