‘एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत आलं पाहिजे, त्यांनी..’’,काय म्हणाले केंद्रीय मंत्री रामदास आठवले?

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असल्याने ते लवकरच सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. त्यापूर्वी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. तर दुसरीकडे भाजपकडून देवेंद्र फडणवीसांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर व्हावी, यासाठी भाजपकडून मास्टरप्लॅन आखण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एकनाथ शिंदे यांना दिल्लीत केंद्रीय मंत्रीपद देण्यात येणार असल्याचे सूचक विधान केले आहे. भाजपने मुख्यमंत्री कोण होणार हे निश्चित केले आहे. आमच्या जागा जास्त आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असा संदेश भाजपकडून एकनाथ शिंदेना देण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत आलं पाहिजे. त्यांनी दिल्लीत योगदान दिलं पाहिजे, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले.

“देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार”
त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल भाष्य केले. मुख्यमंत्री कोण होणार हे भाजपच्या हायकमांडने ठरवलं आहे. “आमच्या जागा जास्त निवडून आल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलं पाहिजे. हा मेसेज एकनाथ शिंदे यांना देण्यात आला आहे.एकनाथ शिंदे हे नाराज असेल तरी त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद दिले जाणार नाही”, असे रामदास आठवले यांनी म्हटले.

“एकनाथ शिंदेंनी निर्णयाला पाठिंबा द्यावा”

“महाराष्ट्रात बिहार पॅटर्न वापरण्यात येणार नाही. बिहारमध्ये निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्रि‍पदाचे आश्वासन दिले होते. त्यामुळे तिथे तो पॅटर्न वापरण्यात आला. मात्र महाराष्ट्राच्या निवडणुकीत असे काही आश्वासन देण्यात आलेले नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी निर्णयाला पाठिंबा द्यायला हवा. महाराष्ट्रात महायुती एकत्र राहणे हे आपल्या फायद्याचे आहे. विकासासाठी आवश्यक आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी फडणवीसांच्या नावाला पाठिंबा द्यावा आणि लवकरात लवकर सत्ता स्थापन करावी”, असेही रामदास आठवलेंनी सांगितले.

“एकनाथ शिंदेंनी दिल्लीत यावं”
“एकनाथ शिंदे हा आमचे मित्र आहेत. ते मुख्यमंत्रि‍पदासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र भाजपचे हायकमांड आणि कार्यकर्ते त्यांना मुख्यमंत्रिपद देण्यासाठी तयार नाहीत. आमच्या जास्त जागा आल्या आहेत. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा अशी लोकभावना आहे. एकनाथ शिंदे हे ज्येष्ठ आहेत. त्यांना जर महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री म्हणून राहायचे नसेल तर ते दिल्लीला येऊ शकतात. त्यांना दिल्लीत जर चांगले मंत्रिपद मिळाले तर यामागे नक्कीच काहीतरी छुपा फॉर्म्युला असू शकतो. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत आलं पाहिजे. त्यांनी दिल्लीत योगदान दिलं पाहिजे”, असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.

“एकनाथ शिंदे यांनी हा प्रस्ताव स्वीकारायला हवा. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून खूप चांगलं काम केले होते. त्यांना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळाले होते. आता त्यांना देवेंद्र फडणवीसांसाठी मुख्यमंत्रि‍पदाचा त्याग द्यावा लागेल”, असेही रामदास आठवले म्हणाले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *