बुलढाणा जिल्ह्यात शिक्षण विभागाचा बट्ट्याबोळ! शिकवण्यासाठी ठेवले चक्क मजूर

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा बट्ट्याबोळ झाला आहे. एकीकडे जिल्हा परिषदेच्या काही शाळांनी सीबीएसई शाळांना मागे टाकले आहे. या शाळांमध्ये अत्याधुनिक शिक्षण व्यवस्था आली आहे. विविध देशातील भाषा शिकवण्यात येत आहे. काही ठिकाणी तर आयआयटी मधील बुद्धिवादी सुद्धा हे चित्र पाहून हरकून गेली आहेत. तर काही ठिकाणी शिक्षणाचा बट्टयाबोळ झाला आहे. या शिक्षणाचा आयचा घो म्हणण्याची वेळ बुलडाण्यात आली आहे.

शिकवण्यासाठी ठेवले चक्क मजूर

बुलडाणा जिल्ह्यातील शेलूद येथील जिल्हा परिषद शाळेवरील महिला शिक्षकांनी चक्क 200 रूपये रोजंदारीवर महिलांना शाळेतील मुलांना शिकवण्यासाठी ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दोन शिक्षिका या बालसंगोपन रजेवर आहेत. स्वत:च्या मुलांना उच्चं शिक्षण मिळावे, यासाठी लातूर येथे गेल्याची माहिती समोर येत आहे . त्यामुळे बालसंगोपनासाठी मिळत असलेल्या रजेचा गैरफायदा घेण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

चक्क मजूर शिक्षक ठेवल्याने जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या गोरगरीबांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थी वाऱ्यावर आहेत. अर्चना बाहेकर आणि शीला बाहेकर असे या महिला शिक्षकाचे नाव आहे. या दोघींनी 200 रुपये रोजंदारीवर विद्यार्थ्यांना आपल्या जागी शिकवायला ठेवल्याचा आरोप करण्यात येत आहे. या दोन्ही शिक्षका अनेक दिवसांपासून सुट्टीवर असल्याचे समजते. या दोन महिला शिक्षिकांना कोणी विचारणा करणार की नाही, असा सवाल विचारण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकारापासून शिक्षण विभाग हा अनभिज्ञ कसा, असा सवाल पालक वर्ग विचारत आहे.

तर शाळा व्यवस्थापन समितीने सुद्धा त्या दोन महिला शिक्षिकांविरोधात बऱ्याच वेळेस तक्रारी केल्या. शिक्षणाधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रकार टाकला. पण त्याला शिक्षण खाते दाद देत नसल्याचा आरोप पालक करत आहेत. शिक्षण मंत्र्यांनी याप्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी करण्यात येत आहे. प्रकरणात दोन शिक्षिकांचे मत समोर आलेले नाही. पण एकूणच या प्रकारामुळे शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *